मृत्यूच्या तांडवाने हादरली द्राक्षनगरी! अंत्यविधीसाठी करावी लागली प्रतीक्षा 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी जगाचा निरोप घेते. तो मृत्यू वार्धक्यात आला तर वेदना जरा कमी असतात. पण, कोरोनाने ऐन तारूण्यात, पन्नाशी गाठलेली चालती - बोलती माणसे काळाच्या पडद्याआड जाऊ लागल्याने पिंपळगाव शहरात त्या घरांतील हुंदके ह्रदय पिळवटून टाकणारे आहेत. गेल्या आठ दिवसात द्राक्षनगरीतील बारा जणांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. त्यामुळे द्राक्षनगरी अक्षरश: हादरली असून, येथे मृत्यू ओशाळला की काय अशी स्थिती झाली आहे. 

पिंपळगाव शहरात सध्या परराज्य, परदेशात द्राक्ष पाठविण्याची लगबग सुरु आहे. मात्र, सध्या त्याहीपेक्षा दु:खाची मोठी किनार दिसत आहे. कोरोनाने एवढे रौद्ररूप धारण केले आहे की दररोज दोघां-तिघांच्या मृत्यूने द्राक्षनगरी सुन्न झाली आहे. श्रीमंतापासून गरिबापर्यंत आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, द्राक्ष उत्पादकांना कोरोनाने शेवटचा श्‍वास घेण्यास भाग पाडले आहे. 

सोमवारी (ता.१२) तर अनेकांच्या मनाला चटका लावत अजातशत्रू तरूण व्यक्तीमत्व असलेले पिंपळगाव सोसायटीचे संचालक संदीप बनकर यांना जीवघेण्या आजारात प्राण गमवावे लागले. त्यांच्या जाण्याने‌ अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तत्पुर्वी गेल्या आठ दिवसात शशि मोरे, युवराज मोरे, समीर टिकले, रमेश वाणी, रवींद्र चव्हाण आदींसह बारा व्यक्तींचे श्‍वास थांबले. यातील बहुतांश व्यक्ती या वयाच्या पन्नाशीच्या आसपास. कर्ता पुरूषच हरपल्याने निराधार झालेल्या कुटुंबातील व्यक्तींचा हंबरडा व घालमेल त्रयस्थ व्यक्तीचे डोळे ओले करुन गेली. काळजाला पाझर फुटावा, असा आक्रोश त्या कुटुबांतील सदस्यांचा सुरू आहे. दुर्दैवाचा फेरा एवढा की रूग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शव थेट स्मशानभूमित नेले जाते. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला अखेरचा निरोपसद्धा देता येत नाही. एरवी सामसूम असणाऱ्या पिंपळगावच्या स्मशानभूमित दररोजच्या दोन-तीन व्यक्तींवरील अंत्यससंस्काराने अग्नीतांडव सुरू असते. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

येथे ओशाळला मृत्यू... 

पिंपळगाव शहरातील सोशल मिडीयाची दररोजची सुरवात शहरातील प्राण गमावलेल्या दोघा-तिघांना श्रद्धांजली देण्याने होत आहे. द्राक्षनगरीत कोरोनाचा ब्लास्ट एवढा भयावह आहे की येथे मृत्यू ओशाळला अशी स्थिती आहे. सोमवारी (ता. १२) तर तब्बल सहा पार्थिव आल्याने अग्नीच्या स्वाधीन होण्यासाठी मृतदेह ताटकळली. यातील एका व्यक्तीने तर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याच्या धसक्याने प्राण सोडले. चार ही दिशांनी सायरणचे आवाज घुमताय. स्मशानभूमितील राबता महामारीचा प्रत्यय आणून देणारा आहे. मृत्यूलाही भय वाटावे, अशी स्थिती आहे. एकाचवेळी चार-पाच चिता जळतांनाचे चित्र मन विषन्न करते. पिंपळगाव शहरात शासकीय व खासगी रूग्णालयात एकूण पाचशे बेड रूग्णांनी फुल्ल आहेत. त्यात पिंपळगाव शहरातील दोनशेहून अधिक रूग्ण सध्या उपचाराखाली असून, काहींना बेड मिळत नाही. बेड आहे तर ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर नाही, अशा जगण्या-मरण्याची लढाई सुरू आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

नातलग काळजीने काळवंडली... 

रूग्णालयांबाहेर नातलग काळजीने काळवंडली आहे. औषधासाठी तडफड सुरू आहे. कोरोनाने द्राक्षनगरीचा श्‍वास गुदमरू लागला आहे. ऐश्‍वर्य मिरविणाऱ्या पिंपळगावमधील सध्याची स्थिती विदारक आहे. किड्या-मुंग्यांसारखी माणसं मृत्यूच्या विळख्यात जात आहे. चिरनिद्रा देणाऱ्या कोरोनाचे थैमान थांबविण्यासाठी कठोर निर्बंध असलेला लॉकडाउन व नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.