नाशिक : कोरोना संसर्गाच्या तीव्र लाटेत कधी ऑक्सजन बेड, कधी ऑक्सिजन सिलिंडर, तर कधी रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, त्यातून रूग्णांच्या नातेवाईकांची होणारी तारांबळ, यंत्रणेची धावपळ आदी गोंधळात आता रूग्णवाहिका अन् शववाहिकांचेही अडथळे आणि त्यामुळे मृत्यूनंतरही होणारी रूग्णांची परवड बघावयास मिळत आहे. याचाच प्रत्यय देणाऱ्या दोन घटना मंगळवारी ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी शहरात घडल्या.
तब्बल सोळा तासानंतर अंत्यसंस्कार
वडाळा-पाथर्डी रोडवरील सदिच्छानगर येथील अंकिता जगझाप-रेळे (वय ६१) दहा दिवसांपुर्वी कोरोना बाधित झाल्या. सोमवारी (ता. १२) श्वसनाचा त्रास होवू लागल्याने त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते सुनील जगझाप यांनी स्वत:च्या कारद्वारे ऑक्सिजन बेडसाठी रुग्णालयांचे उबंरठे झिजवले. मात्र, कुठेही बेड मिळाला नाही. मंगळवारी (ता. १३) सकाळी आठला कसेबसे नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात बेड उपलब्ध होईल असे सांगण्यात आले. त्या आशेवर त्यांनी मध्यरात्री बाराच्या सुमारास अंकिता यांना अत्यवस्थ असूनही घरी आणले. परंतू, तासाभरातच त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर सुरू झाली शववाहिकेसाठीची पळापळ मध्यरात्री अनेकांना दुरध्वनी करण्यात आले. शववाहीका मिळत नाही म्हटल्यावर रुग्णवाहीकेचाही तपास केला. परंतू, कोणीही प्रतिसाद दिला नाही. जिल्हा रूग्णालय परिसरातील एका खासगी रूग्णवाहिका चालकाने साडेपाच हजार रूपये घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोचविला. तत्पूर्वी, नातेवाईकांना पहाटे पाचला नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होतील, असा निरोप देण्यात आला होता.
हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू
त्यानुसार नातेवाईक स्मशानभुमीत पोचले. मात्र, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात मृतदेहावर सरकारी सोपस्कार पार पाडण्याचीही तसदी घेतली गेली नाही. या सगळ्या गदारोळात मृत्युनंतर सोळा तास उलटूनही नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह मिळाला नाही. अखेर सायंकाळी चारच्या सुमारास मृतदेहाकडे पाहण्यास जिल्हा रुग्णालयाला सवड मिळाली व सायंकाळी सहाच्या सुमारास अंत्यसंस्कार करून नातेवाईक परतले.
हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात
लेकीने स्वत:च्या कारमध्ये आईचा मृतदेह पोहचवला स्मशानात
संवेदनाहिनतेचा अनुभव देणाऱ्या या घटनांत पंचवटीतील एका लेकीला स्वत:च्या कारमध्ये आईचा मृतदेह पंचवटी अमरधामपर्यंत पोचवावा लागला, तर इंदिरानगर भागातील एका महिलेवर तब्बल सोळा तासांनंतर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर आली.
जिथे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड तर सोडाच, शववाहिकासुद्धा उपलब्ध करून दिली जात नसेल, तेथे माणुसकीच संपली आहे. या साऱ्या प्रकारात महापालिकेचा नाकर्तेपणा उघड झाला आहे.
-सुनील जगझाप, सामाजिक कार्यकर्ते.