मेअखेरीस नाशिक शहरावर पाणीकपातीचे संकट; जेवढे पाण्याचे आरक्षण तेवढाच वापर

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस पडल्यानंतर धरणांमध्ये पाणीपातळी समाधानकारक असली, तरी वर्षभरात शहरात मोठ्या प्रमाणात म्हणजे नियमितपेक्षा अधिक पाणीउपसा केला जात आहे. त्यात दारणा धरणातून पाणी उचलणे बंद करण्यात आल्याने सर्व ताण गंगापूर धरणावर येत आहे. परिणामी, जेवढे पाण्याचे आरक्षण तेवढाच वापर करता येणार असल्याने मेअखेरीस नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

मेअखेरीस शहरावर पाणीकपातीचे संकट 
नाशिक शहराला गंगापूर धरण समूह, मुकणे व दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार दर वर्षी पाण्याची मागणी वाढत आहे. गेल्या वर्षी गंगापूर धरण समूहातून तीन हजार ६०० दशलक्ष घनफूट, मुकणे धरणातून एक हजार, तर दारणा धरणातून चारशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित होते. मात्र, वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरत नसल्याने धरणांमधून अतिरिक्त पाणी उचलले गेले. एकूण पाच हजार दशलक्ष घनफुटांव्यतिरिक्त दोनशे दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणीपुरवठा शहरासाठी करण्यात आला होता. त्यामुळे या वर्षी ५०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविण्यात आली.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

पाण्याचा अतिरिक्त वापर; दारणातून पाणी उचलणे बंद 

गंगापूर धरण समूहातून तीन हजार ८०० दशलक्ष घनफूट, मुकणे धरणातून एक हजार ३००, तर दारणा धरणातून ४०० दशलक्ष घनफूट याप्रमाणे पाण्याची मागणी नोंदविण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मागणीनुसार जलसंपदा विभागाला त्याप्रमाणे सूचना दिल्या. प्रत्यक्षात कागदावर वाढीव पाणी आरक्षण देण्याची वेळ आली. त्या वेळी जलसंपदा विभागाने कश्‍यपी, गौतमी गोदावरी धरणात मागील वर्षी एक टीएमसी, तर मुकणे धरणात एक अशी दोन टीएमसी पाण्याची तूट असल्याचे कारण देत वाढीव पाणी देण्यास तोंडी नकार दिला आहे. पाणी देण्यास थेट नकार कळविता येत नसल्याने लोकसंख्या, संस्थात्मक पाणीवापर, पाणीगळतीचा आधार घेऊन जलसंपदा विभागाकडून अडसर निर्माण केला जात आहे. शहरात गंगापूर धरणातून अतिरिक्त पाणीउपसा होत असल्याने मेअखेरीस नाशिककरांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

दारणातून उपसा बंद 
दारणा धरणातून अळी व गाळमिश्रित पाणी येत असल्याने आतापर्यंत म्हणजे १६७ दिवसांमध्ये अवघे १६.७१ दशलक्ष घनफूट पाणी उचलण्यात आले. दारणाऐवजी गंगापूर धरणातून पाणीउपसा केला जात आहे. गंगापूर धरणातून तीन हजार ८०० दशलक्ष घनफूट पैकी २३४८.६८ दशलक्ष घनफूट पाणी उचलण्यात आले आहे. सध्या गंगापूर धरणात १४५१.६८ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. साधारण ५३० ते ५४० दशलक्ष लिटर पाण्याचा रोजचा वापर आहे. 

पाण्याचा असा झाला वापर 
महिना वापर (दशलक्ष घनफुटांत) 

१५ ते ३१ ऑक्टोबर ३१२.५५ 
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ५४९.४२ 
१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ५७१.१६ 
१ जानेवारी ते ३१ जानेवारी ५६४.६४ 
१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी ५०३.८५ 
१ मार्च ते ३० मार्च ५४६.७६