मेगा टेक्स्टाइल पार्कची महाराष्ट्राला आस; खानदेशमधून प्रयत्न सुरू

न्यायडोंगरी (जि. नाशिक) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना देशात तीन वर्षांत सात मेगा टेक्स्टाइल पार्क उभारण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे कापूस उत्पादक महाराष्ट्राला या पार्कची आस लागली आहे. अशातच, हा पार्क खानदेशात उभारला जावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. 

खानदेशात मेगा टेक्स्टाइल पार्क होण्यासाठी चार पत्रे केंद्र सरकारला पाठविली आहेत. वस्त्रोद्योग सचिव यू. पी. सिंह यांची भेट घेतली. आता जळगावचे पालकमंत्री, उत्तर महाराष्ट्रातील आमदारांसह राज्याचे उद्योगमंत्री, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली जाईल. तसेच राज्य सरकारने केंद्राकडे पार्कसाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती केली जाणार आहे, अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली. दरम्यान, एक हजार एकर क्षेत्रामधील एकात्मिक पार्कमध्ये सर्व सुविधांयुक्त तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणार आहे. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

राज्याच्या आणि केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष

नवीन वस्त्रोद्योग धोरणानुसार भारतीय कापड उद्योग सक्षम बनविणे, तांत्रिक कापडनिर्मिती, वैश्‍विक ब्रॅन्डिंग, उत्पादनात उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यातीत भारतीय कापड क्षेत्रासाठी संधी उपलब्ध होणार आहे. देशात कपाशीखालील क्षेत्र १२९ लाख हेक्टर असून, त्यांपैकी महाराष्ट्रात एकतृतीयांश म्हणजेच ४२ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. राज्याचे कापूस उत्पादन ८५ लाख कापूस गाठी असून, त्यांपैकी २० ते २५ टक्के कापूस राज्यातील सूतगिरण्या व कापड उद्योग यावर प्रक्रियेसाठी वापरला जातो. उर्वरित कापूस इतर राज्यांमध्ये जातो. मेगा टेक्स्टाइल पार्कमुळे रोजगाराच्या संधीबरोबर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. चांगल्या पायाभूत सुविधा, मुबलक कापूस उत्पादन, सर्व भागांचे दळणवळण, कुशल मनुष्यबळ, दर्जेदार शिक्षण उपलब्ध असल्याने राज्याच्या मेगा टेस्क्टाइल पार्कसाठी राज्याचा दावा प्रबळ आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विभागातील कापूस उत्पादक, कापसावर आधारित व्यावसायिकांचे लक्ष त्याच अनुषंगाने राज्याच्या आणि केंद्राच्या भूमिकेकडे लागले आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

महाराष्ट्रात मेगा टेक्स्टाइल पार्क झाल्यास उपलब्ध कापूस स्थानिक ठिकाणी वापरला जाईल. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मुबलक कापूस उत्पादन असल्याने या विभागात वस्त्रोद्योगाचे जाळे निर्माण होईल. वस्त्रोद्योगावर आधारित कारखाने उभारले जातील आणि रोजगारनिर्मितीच्या जोडीला स्थानिक कापूस उत्पादकांना अधिक दरही मिळेल. 
-गोविंद वैराळे, निवृत्त व्यवस्थापक, कापूस पणन महासंघ