मेट्रोची घोषणा होताच भाजप कार्यालयात जल्लोष; दत्तक विधानाची पूर्तता केल्याचा आमदार फरांदेंचा दावा 

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रो प्रकल्पासाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा होताच भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात जल्लोष करण्यात आला. ‘दत्तक विधान’ प्रत्यक्षात उतरविल्याचा दावा आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला. 

आता तरी सहकार्य करावे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक दत्तक घेतले होते. मात्र, मतदारांचा कौल झुगारून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. भाजप सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांना स्थगिती देण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला आहे. नाशिक मेट्रो प्रकल्पाला स्थगिती देण्याचे प्रयत्न होते. मात्र, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी भरीव तरतूद करताना विकासाला आड येणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले. आता तरी राज्य सरकारने प्रकल्पासाठी सहकार्य करावे, असे आमदार फरांदे म्हणाल्या.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

‘मोदी है तो मुमकीन है’

नाशिक मेट्रोसाठी आर्थिक तरतूद केल्याने ‘मोदी है तो मुमकीन है’, याची प्रचीती नाशिककरांना आली, असे शहराध्यक्ष गिरीश पालवे म्हणाले. नाशिक मेट्रोला चालना मिळाल्याने नाशिककरांमध्ये नवी ऊर्जा संचारल्याचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. आमदार सीमा हिरे, महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, पवन भगूरकर, वर्षा भालेराव, अनिल भालेराव, सुप्रिया खोडे, सुनील केदार, चंद्रकांत खोडे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार