मेट्रो़मुळे राजकारणाची दिशा बदलणार! भाजपमध्ये आनंदोत्सव, तर शिवसेनेत धडकी 

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेचे सर्व स्तरातून स्वागत होत असताना, राजकीय धुराळा उडण्यास सुरवात झाली आहे. या माध्यमातून पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या राजकारणाची दिशाही बदलणार असून, सत्ताधारी भाजपमध्ये आनंदोत्सव, तर शिवसेनेत धडकी भरली आहे. 

मेट्रो़मुळे राजकारणाची दिशा बदलणार 
पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार असून, त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महापालिकेत सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची संधी शिवसेनेकडून सोडली जात नाही. सद्यःस्थितीत शिवसेनेचे पारडे जड झाले. त्यात भाजपमधून काही मोठ्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाची ताकद वाढली आहे. अंतर्गत हेवेदावे, महापालिकेतील राजकारणामुळे भाजपमध्ये मरगळ निर्माण झाली. २०१७ च्या महापालिका निवडणूक प्रचारात तत्कलीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली. मात्र, चार वर्षांत विकासाचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य न करता आल्याने आगामी निवडणुकीत भाजपला याच मुद्यावरून घेरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र, नाशिक मेट्रोची घोषणा झाल्याने भाजपमधील मरगळ झटकली गेल्याचे दिसून आले, तर शिवसेनेत काहीसा चिंतेचा सूर आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

दत्तक विधानाला जागलो : महापौर 
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक मेट्रो प्रकल्प केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतल्याबद्दल महापौर नात्याने त्यांचे अभिनंदन. विकासाच्या दृष्टीने प्रकल्प महत्त्वाचा आहे. भारतातील पहिली निओ मेट्रो नाशिकमध्ये होणार आहे. प्रकल्पासाठी श्री. फडणवीस यांनी जो शब्द दिला होता, तो पूर्ण करून दाखविला. यामुळे नाशिकच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. नाशिक- मुंबई- पुणे या सुवर्ण त्रिकोणाला आणखी झळाळी मिळेल, असा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला. 

हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार 

महापौरांचे अर्धवट ज्ञान- बोरस्ते 
महापौर सतीश कुलकर्णी अपूर्ण माहितीच्या आधारे शिवसेनेकडून प्रस्ताव अडविल्याचा चुकीचा आरोप करीत होते. हे यानिमित्त स्पष्ट झाले. शिवसेनेने प्रस्ताव अडविला होता, तर केंद्र शासनाने मंजुरी कशी दिली? यापुढे अर्धवट ज्ञानाचे प्रदर्शन करण्यापेक्षा किमान अभ्यास करून बोलावे. सूडाचे राजकारण न करता नाशिकच्या विकासासाठी राज्य सरकारने केंद्राला तत्काळ प्रस्ताव पाठविल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले.