‘मेट्रो निओच्या घोषणेने अपप्रचार करणाऱ्यांना चपराक’; अभिनंदनच्या ठरावातून भाजपचा विरोधकांवर निशाणा 

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काहीच केले नाही, असा अपप्रचार शिवसेनेसह विरोधकांकडून सुरु आहे. परंतु, मेट्रो निओ प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करून भाजपने विरोधकांना मोठी चपराक दिल्याचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितले. मेट्रोमुळे नाशिकच्या विकासाची खऱ्या अर्थाने पाया भरणी केल्याचे ते म्हणाले. 

नाशिक शहरातील प्रस्तावित टायरबेस मेट्रोसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात २०९२ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह नियोजन प्रक्रियेतील अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यासाठी भाजपचे शहर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष व पदाधिकायांची वेब मिटींग आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालवे बोलत होते. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

आता तरी अपप्रचार थांबवावा..

मेट्रो निओमुळे नाशिक देशाच्या नकाशावर प्रमुख शहर म्हणून नावारुपाला येईल. त्याचबरोबर पर्यावरण, कृषी, औद्योगिक क्षेत्रात नाशिक गरुडझेप घेईल असे ते म्हणाले. महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले, मेट्रोमुळे नाशिकच्या विकासात भर पडेल. रेल्वे, हवाई सेवेच्या माध्यमातून शहर प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे. गेल्या चार वर्षात महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने विकासाचे अनेक प्रकल्प राबविले गेले. येत्या वर्षभरात नवीन कामे नागरिकांना दिसणार आहे. नाशिक चा विकास खुंटल्याचा अपप्रचार करणायांनी आता तरी अपप्रचार थांबवावा, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले. ज्येष्ठ नेते विजय साने, आमदार सीमा हिरे, प्रा. सुहास फरांदे, आमदार राहुल ढिकले, सरचिटणीस जगन पाटील, सुनील केदार, प्रवीण अलई, अलका जांभेकर, देवदत्त जोशी, संगीता गायकवाड, मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, ज्ञानेश्वर काकड, अविनाश पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पवन भगूरकर यांनी केले. प्रशांत जाधव यांनी आभार मानले. 
 
मेट्रो आराखड्यासाठी तरतूद : निमसे 

सन २०१२ मध्ये स्थायी समिती सभापती असताना शहराचा वाढता विस्तार व वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रो, लोकलसाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी ९९ लाख रुपयांची तरतूद केली होती. त्याचा फायदा झाला. माझ्या कार्यकाळात मेट्रोसाठी प्रयत्न केल्याने त्याचे फलित मिळाल्याचे स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी सांगितले. 
हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच