मेट्रो निओ प्रकल्प शिवसेनेमुळे रखडला; देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

नाशिक : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री असताना मी नाशिकला मेट्रो निओ प्रकल्प दिला होता. परंतु, हा प्रकल्प अमलात न आणता शिवसेनेकडून अडथळे निर्माण केले जात आहे. प्रकल्पातील त्रुटींची फाईल आठ महिन्यांपासून रखडवून ठेवल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दत्तक नाशिकवर टीका करणाऱ्यांचा समाचार 

नाशिक दौऱ्यावर आलेल्या  फडणवीस यांनी आज (ता.१३) माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी दत्तक नाशिकवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, नाशिक दत्तक घेतल्यानंतर लोकांनी मला घरी बसविले, विरोधात असले तरी नाशिकवरचे माझे प्रेम कधी कमी झालेले नाही. यामुळे मी नाशिक सोडणार नाही. देशाला मॉडेल ठरणारा टायरबेस मेट्रोचा प्रकल्प शिवसेनेकडून अडवून ठेवला आहे. मी मुख्यमंत्री असताना जगातील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून नाशिकमध्ये मेट्रो निओचा प्रकल्प साकार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुर्दैवाने त्यात राजकारण होत आहे. प्रकल्पातील त्रुटींच्या पुर्ततेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे फाईल पाठविण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून फाईल लालफितीत बंद करून ठेवण्यात आली आहे. राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवून प्रकल्पाला चालना देण्याची मागणी करताना प्रकल्प साकार झाल्यास नाशिक आंतरराष्ट्रीय शहर होईल, असा दावा श्री. फडणवीस यांनी केला. शहराच्या विकासात राजकारण आणण्याची वृत्ती बदलणे गरजेचे असल्याचे सांगताना महाविकास आघाडी सरकारकडून नाशिकच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

राज्यात भाजपची सत्ता असताना नशिकसाठी निओ मेट्रो प्रकल्प आणला. मात्र, राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर या प्रकल्पाविषयी राजकारण आले. केंद्र सरकारने प्रकल्पाबाबत माहिती मागविली आहे. राज्य सरकारकडे नऊ महिन्यांपासून फाईल पडून आहे. राज्य सरकारने आता तरी निर्णय घ्यावा. 
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात