मेट्रो स्थानकांना नवीन शहर बस करणार कनेक्ट; मनपा आयुक्तांच्या सूचना 

नाशिक : केंद्र सरकारने मेट्रोसाठी केलेली घोषणा व येत्या काळात महापालिकेतर्फे शहर बससेवा सुरू होणार आहे. या माध्यमातून सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अधिक भक्कम होणार आहे. अधिक सोयीस्कर प्रवासासाठी आता मेट्रो स्थानकाच्या मार्गावर प्रस्तावित बससेवा कनेक्ट करण्याचा निर्णय परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मंगळवारी (ता. २) बैठक झाली. अर्थसंकल्पात महामेट्रोसाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांची घोषणा झाली. त्याअनुषंगाने बससेवेचा विचार करण्यात आला. प्रवाशांना अधिक जलद सेवा मिळण्यासाठी बससेवा कनेक्ट केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात अडीचशे बस

मेट्रो निओसाठी सुरवातीला दोन एलिव्हेटेड कॉरिडोर उभारले जाणार आहेत. पहिला एलिव्हेटेड कॉरिडोर १० किलोमीटर लांबीचा आहे. त्यात गंगापूर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानके असतील. दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड असा २२ किलोमीटर लांबीचा असून, त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर, नाशिक रोड अशी स्थानके असतील. सीबीएस कॉमन स्थानक असून, येथून दुसऱ्या म्हणजे मुंबई नाका कॉरिडोरला जोडणारा जंक्शन असेल. टायरबेस मेट्रोसाठी एकूण ३० स्थानके असणार आहेत. शिवाय दोन फिडर कॉरिडोर असतील. त्यापैकी एक सातपूर कॉलनी, गरवारे, मुंबई नाकादरम्यान चालेल, तर दुसरा नाशिक रोड, नांदूर नाका, शिवाजीनगरदरम्यान चालेल. महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात अडीचशे बस चालविल्या जाणार आहेत. त्यातील २०० बस सीएनजी, तर ५० बस डिझेलवर चालतील. प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त हुकल्याने फेब्रुवारी अखेर किंवा मार्चअखेरीस बससेवा सुरू होईल. बससेवेसाठी महापालिकेने सुमारे ७४९ बस मार्ग निश्‍चित केले आहेत. आता मार्गिकांचे पुनर्निर्माण करून त्यात मेट्रो स्थानकांशी कनेक्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

मेट्रो मार्गिका, तसेच वेळेनुसार प्रस्तावित शहर बस चालविल्या जाणार आहेत. यासंदर्भात परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. मेट्रो प्रवासानंतर घरपर्यंत जलद गतीने प्रवासासाठी नियोजन करण्यात येणार आहे. 
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका 

 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच