मोकळ्या भूखंडावर पालिकेचेच अनाधिकृत बांधकाम! अतिक्रमण विभागाकडून पाडण्याची तयारी 

नाशिक : मोकळा भूखंड व ॲमेनिटी स्पेसमध्ये सार्वजनिक वापराच्या मिळकती बांधताना १५ टक्क्यांपेक्षा अधिक बांधकामाला परवानगी नसतानाही महापालिकेने बांधकाम केलेल्या ३६ मिळकती अनाधिकृत ठरत असल्याने अतिरिक्त बांधकाम पाडण्याची तयारी महापालिकेने केली आहे. 
महापालिकेकडे हस्तांरित केलेल्या मोकळ्या भूखंडावरील ॲमेनिटी स्पेसमध्ये एकूण क्षेत्राच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम करता येत नाही. पंधरा टक्के बांधकामात तळमजल्यावरील बांधकाम दहा टक्के, तर पहिल्या मजल्यावर पाच टक्के बांधकाम अनुज्ञेय आहे. परंतु पालिकेने सार्वजनिक हितासाठी मिळकती उभारताना या नियमाचा भंग केला आहे, तर खासगी जागा मालकांकडूनही या नियमांचा भंग झाला आहे.

अतिक्रमण विभागाकडून पाडण्याची तयारी 

खासगी जागामालकांना नोटीस बजावताना पालिकेकडे कोणी बोट दाखवू नये म्हणून सर्वेक्षण करण्यात आले. खुल्या जागा व ॲमेनिटी स्पेसमधील एक हजार ७५ मिळकती तपासण्यात आल्या. त्यात सार्वजनिक हितासाठी उभारण्यात आलेल्या ३६ मिळकती पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम झालेल्या आढळल्या. प्रथम त्या मिळकतींचे अतिरिक्त बांधकाम तोडण्याची तयारी करण्यात आली असून, नगररचना विभागाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

२१६ मिळकतींचा फुकटात वापर 
न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार सर्वेक्षण करण्यात आले. त्यात बाजारमूल्य तक्ता दराच्या अडीच टक्के दराने ४९ मिळकतींवर भाडे आकारले जात आहे. १९५ मिळकती भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. २१६ मिळकती अशा आहेत की त्यावर भाडेच आकारले जात नाही. २२ मिळकतींवर संधीशुल्क आकारले जात आहे. ७५ मिळकतींमध्ये अंगणवाडी, तर ५९ मिळकती धार्मिक कार्यासाठी वापरल्या जात आहेत. सार्वजनिक कामासाठी १६९ मिळकतींचा वापर केला जात आहे. आठ मिळकतींचा करार संपला आहे, तर आठ मिळकती बंद आहेत. महापालिकेच्या ताब्यात १४४ मिळकती असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.  

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात