मोकळ्या मैदानावर भाजीपाला विक्रीस परवानगी; मनपा उपायुक्तांची माहिती 

नाशिक : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्बंध कडक केल्याने भाजीपाला, किराणा खरेदी करताना होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील सर्व भाजीपाला केंद्रे बंदिस्त केले होते. त्यात रविवारी (ता. ११) पुन्हा वाढ केली असून, सोसायटी, मोकळे मैदान आदी ठिकाणीही भाजीबाजार टाकण्यास परवानगी दिली आहे. 

मोकळ्या मैदानावर भाजीपाला विक्रीस परवानगी
महापालिकेने यापूर्वी घोषित केलेले १०४ ठिकाणांसह विभागीय कार्यालयांतर्गत मनपा मालकीची मैदाने, मोकळी जागा, सोसायटी व कॉलनीच्या मोकळ्या आवारात भाजीपाला व फळ विक्री करण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली. नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात असताना, भाजीपाला व फळ खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याच्या दृष्टीने महापालिकेने यापूर्वी १०४ ठिकाणी भाजीपाला व फळ विक्रीसाठी परवानगी दिली होती. ज्या ठिकाणी बंदिस्त असलेले आत व बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग असलेले भाजी मार्केट करण्याबाबत विभागीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

मनपा उपायुक्त प्रदीप चौधरी यांची माहिती 

याव्यतिरिक्त विभागीय कार्यालयांतर्गत महापालिकेच्या मालकीची मैदाने, मोकळी जागा, तसेच सोसायटी व कॉलनीच्या मोकळ्या आवारात एकाच ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, तोंडावर मास्क घालणे, विक्रेत्यांनी हातामध्ये हॅन्डग्लोजचा वापर करणे व इतर नियमांचे निकष पाळून भाजीपाला व फळ विक्री करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली. तसेच भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी सेवा देताना अनावश्यक गर्दी होणार नाही, दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतराचे पालन राहील, तोंडावर मास्क घालून विक्रेत्यांनी हॅन्डग्लोज वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन उपायुक्त चौधरी यांनी केले आहे.

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ