मोजक्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर अतिक्रमणविरोधी मोहीम; विक्रेते, पथकातील पाठशिवणीचा खेळ सुरूच 

पंचवटी (जि. नाशिक) : महापालिकेच्या मोजक्या कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणविरोधी पथकाची भिस्त आहे. या कर्मचाऱ्यांच्या जिवावर पंचवटी विभागातील तब्बल आठ ते दहा  बाजारांवर लक्ष देण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची मोहीम कशी यशस्वी करणार, असा सवाल पंचवटीतील महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला पडला आहे. यातच अनेक कर्मचारी रोजंदारीवरील आहेत. 

कोरोनाच्या पुन्हा मोठ्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी आठवडे बाजारासही अन्य छोट्या- मोठ्या भाजीबाजाराला मनाई केली आहे. त्यामुळे महापालिका पंचवटी अतिक्रमण विभागातील मोजके कर्मचारी अन् भाजीविक्रेते यांच्यात पंधरा दिवसांपासून पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. पंचवटी विभागात गंगाघाटावर दर बुधवारी मोठा आठवडे बाजार भरतो. याशिवाय म्हसरूळ आडगाव शिवारातील जत्रा हॉटेल चौफुली, निलगिरी बाग, कोनार्कनगर, भडक दरवाजा, म्हसरूळचा कन्सारामाता चौक, कलानगर आदी ठिकाणी मोठा भाजीबाजार भरतो. जिल्हा प्रशासनाने मज्जाव करूनही हे बाजार सुरुच आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगसह मास्करचा वापर होत नसल्याने ही ठिकाणे कोरोना संसर्गास सहाय्यभूत ठरत आहेत. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

क्षणिक कारवाई 

महापालिकेच्या अनेक विभागात जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेले मोजके कायम कर्मचारी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ही मोहीम सुरु आहे. परंतु, या सर्व बाजारात मोठे अंतर असल्याने पथकाची पाठ वळताच पुन्हा भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण असा लपाछपीचा खेळ सुरू आहे. खरेतर प्रत्येक बाजारात स्वतंत्र कारवाई केल्यास ती परिणामकारक ठरू शकते, असे हे कर्मचारी सांगतात. पथक म्हसरूळ अथवा निलगिरी बागेत कारवाईसाठी जाताच, अन्य ठिकाणी पुन्हा विक्रेते ठाण मांडत आहेत. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

खरेदीदारांची चंगळ 

पथक कारवाईसाठी येताच काही विक्रेते गणेशवाडी परिसरातील गल्लीबोळात धूम ठोकतात. त्यामुळे हा खेळ बराचवेळ सुरुच राहतो. अनेक विक्रेते पथकाने भाजीपाला जप्त करण्यापेक्षा आहे, त्याकिमतीपेक्षा निम्म्या दरात विक्री करतात, त्यामुळे खरेदीदारांची चंगळ होत आहे. मेथी, खोथंबिरीची जुडी अवघी पाच रूपयांत उपलब्ध होती. मागील आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही हेच चित्र होते.