मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू : बावनकुळे

मोदी व बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘व्हिजन २०२०’ या पुस्तकात देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी एखादा युगपुरुष निर्माण होईल, असा विचार मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ते युगपुरुष असून, मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे श्री संताजी मंडळ व श्री संताजी महाराज नागरी पतसंस्था महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेअंतर्गत आयोजित भव्य नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार, तर व्यासपीठावर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, माजी महापौर ॲड. यतीन वाघ, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे आदी उपस्थित होते. पुढे बावनकुळे म्हणाले की, ‘जगातील १५५ देशांनी मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे. युगपुरुष म्हणून त्यांचे नाव अजरामर होईल. २०३५ पर्यंत जगातील ७० टक्के देश म्हातारे होतील, तेव्हा भारत मात्र युवा देश म्हणून पुढे येईल. पंतप्रधान मोदी यांची शिक्षणनीतीच देशाला पुढे घेऊन जाईल. मानव संसाधन म्हणून भारताचा संपूर्ण जगावर कब्जा असेल. त्यामुळे प्रत्येक घरात मानव संसाधन कार्यकर्ता निर्माण व्हायला हवा. त्याकरिता मोदींची नवी शिक्षानीती प्रत्येकाने स्वीकारायला हवी. २०२४ ते २०२९ हा काळ देशातील शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच कोरोनामुळे युरोपमधील ४ ते ५ लाख लोकसंख्या असलेले देश अक्षरश: रडत होते. परंतु १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावरील मास्क काढण्याचे काम मोदी सरकारने केले. आजही ८० देशांचे राजदूत मोदींकडे लशीसाठी मागणी करीत आहेत. त्यामुळे मोदींचे व्हिजनच देशाला बळकट करण्यासाठी फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. दरम्यान, यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह रामदास तडस यांचा समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार अशोक व्यवहारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सुरेश काळे, अविनाश पवार, मिलिंद वाघ, सागर कर्पे यांनी प्रयत्न केले.

फडणवीस हेच मुख्यमंत्री

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करताना कार्यकर्त्यांनी पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला. मात्र, देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले. लोकनेता म्हणून त्यांचा लौकिक असून, जात, धर्म, पंताच्या पलीकडे जाऊन ते आपले कर्तव्य बजावत असल्याचेही बावनकुळे म्हणाले. त्याचबरोबर मोदींचे हात बळकट करण्यासाठी ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गजूनाना भाजपमध्ये या

तेली समाजाचे नेते तथा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गजानन शेलार यांना भाजपमध्ये येण्याचे थेट ऑफरच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ‘गजूनाना तुमची भाजपला गरज आहे. त्यामुळे तुम्ही आता जास्त दिवस तिकडे राहू नका. पुढे काय करायचे ते ठरवू’ अशी थेट ऑफर बावनकुळे यांनी दिल्याने, सभागृहात हशा पिकला.

शरद पवारांचा कार्यक्रम

शरद पवार बऱ्याच काळ तालीम संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर कोणीही डाव टाकूच शकत नाही. पण रामदास तडस यांनी पवारांचा कार्यक्रम केला. जे सर्वांचा कार्यक्रम करतात, त्यांचाच कार्यक्रम केला अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते गजानन शेलार यांनी महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास तडस यांचे कौतुक केले. त्याचबरोबर नाशिकमधील तीन आमदारांपैकी कोणाला तरी मंत्रिपद द्या, भलेही राज्यमंत्री दिले तरी चालेल अशी मागणी शेलार यांनी याप्रसंगी केली.

हेही वाचा :

The post मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू : बावनकुळे appeared first on पुढारी.