मोबाईलमुळे फोटोग्राफी व्यवसायाला बसतोय फटका; फोटोग्राफी व्यावसायिकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’  

मालेगाव (जि.नाशिक) : सध्या नव्या मोबाईलमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने ६४ ते १०० हून अधिक मेगापिक्सेल कॅमेराचा वापर सुरू आहे. यांसह इतर अनेक इफेक्टदेखील मोबाईलमध्ये मिळत असल्याने याचा थेट परिणाम फोटोग्राफी व्यवसायावर होत आहे. यामुळे फोटोग्राफी व्यावसायिकांमध्ये मोबाईल फायदेशीर असला तरी ‘कही खुशी, कही गम’ अशीच परिस्थिती आहे. मोबाईल क्रांतीमुळे मागील दोन ते तीन वर्षांत फोटोग्राफी व्यवसायातील अनेकांनी काडीमोड करून अन्य व्यवसायांत लक्ष घातले. स्मार्टफोनचे प्रमाण प्रचंड वाढल्याने त्याचा फोटोग्राफीत प्रचंड वापर आहे. 

मोबाईल नव्या आवृतीत ६४ मेगापिक्सेलपेक्षा मोठे कॅमेरा असल्याने क्वालिटी सुंदर मिळते. त्यामुळे बदलत्या फिचरचे मोबाईल शूटिंग करण्यासही चांगले असतात. त्यात वेगवेगळे फोटो एडिटर, फोटो मेकर, फोटो विषयक ॲप असल्याने तरुणाईला त्याचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे प्रत्येक जण बसल्याजागी हवा तेव्हा हवे तेवढे फोटो क्लीक करतात. पर्यटनासाठी असो वा कुठल्याही लोकेशनला शून्य मिनिटांत मोबाईलचा फोटो घेता येतो. सेल्फी फोटोग्राफीमुळे तरुणाईसह सर्वांचे आकर्षण वाढले. अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमात फोटोसाठी मोबाईलचा वापर वाढला. काढलेले फोटो कमी खर्चात थेट लॅबमध्ये जाऊन प्रिंट करता येतात. शाळा, महाविद्यालय, शेतकरी व्यवसाय सर्वच क्षेत्रांत मोबाईल फोटोग्राफी वाढल्याने हल्ली फोटोग्राफर बोलवणे मात्र टाळले जाते. यामुळे छायाचित्रण क्षेत्रातील व्यवसायाला घरघर लागली. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

विशेषतः लग्नसमारंभ, विविध क्षेत्रांतील मोठे कार्यक्रम वगळता फोटोग्राफर अपवादात्मक आढळतात. अनेक झेरॉक्स, डीटीपी, संगणक दालनातही मोबाईलवर तत्काळ फोटो काढून मिळू लागल्याने स्टुडिओकडे ग्राहक फिरकत नाही. मॉडेलिंग, लघुपट, चित्रीकरण यामध्येदेखील मोबाईल येत असल्याने फोटोग्राफी व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
 

खरंतर जगण्याच्या समृद्ध आठवणींना ताजे करण्याचे काम छायाचित्रांतून होत असते. मोबाईलच्या वाढत्या वापराने अनेक जण बेरोजगार झाले. आजही हौशी ग्राहक स्टुडिओलाच प्राधान्य देतात. -राजेश जाधव, संचालक रचना स्टुडिओ, मालेगाव कॅम्प 
 
ग्रामीण भागात फोटोग्राफी लग्नापुरती मर्यादित झाली. मोठ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील लग्न ही जमेची बाजू आहे अन्यथा वर्षभर रोजंदारी मिळणे अवघड होऊन बसले. -सुनील खैरनार, अध्यक्ष, फोटोग्राफर असोसिएशन