मोबाईलमुळे बालकांच्या लठ्ठपणात वाढ; शारीरिक, मानसिक स्वास्थ्य खालावतेय 

नाशिक : आजपर्यंत मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणाऱ्या पालकांना ऑनलाइन शिक्षणामुळे त्यांच्या हातात मोबाईल देण्याची वेळ आली. तसेच मोबाईलच्या व्यसनामुळे लहान मुलांचे मानसिक, शारिरिक स्वास्थ्यही खालावू लागले आहे. वर्षभरापासून कोरोनामुळे मुलांचे ऑनलाइन शिक्षण मोबाईल किंवा संगणकावर सुरू आहे. त्यातच बाहेर जाण्यावर असलेल्या निर्बंधामुळे लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागले असून, त्यात असणाऱ्या विविध ॲपमुळे लहान मुलांच्या हातात सतत मोबाईलवर असल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यात लठ्ठपणाबरोबरच चिडचिडपणा, डोळ्यांचे नंबर वाढणे, डोळे दुखणे आदी समस्या वाढल्या आहेत. 

हेही वर्ष ऑनलाइन शिक्षणातच वाया जाणार असल्याची भीती
वर्षभरात मुलांमध्ये मोबाईल गेमसह व्हिडिओ गेम खेळण्याचे प्रमाणही वाढले आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे गेल्या वर्षाप्रमाणे हेही वर्ष ऑनलाइन शिक्षणातच वाया जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. मुलांना मोबाईलचे व्यसन लागल्यामुळे परिणामी मैदानी खेळांकडे लहान मुलांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. येत्या काळात ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना लागलेली मोबाईल, संगणकासह टीव्हीची सवय तोडणे पालकांसमोर आव्हान ठरणार आहे. कोरोनामुळे शहरातील मैदान, उद्यानांमध्ये मुलांना पाठवण्यात पालकांची ना असल्यामुळे वर्षभरापासून मुले घरातच आहेत. शाळांकडून ऑनलाइन शिक्षणाबरोबरच परीक्षाही ऑनलाइन घेण्यात येत असल्यामुळे याचाही परिणाम जाणवत आहे. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

कोरोनामुळे वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसते. नाशिकमध्ये डिप्रेशनच्या केसेसबरोबरच बालकांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने शाळेतील शिक्षक, मुलांचे कोरोना लसीकरण करून शाळा सुरू कराव्यात. 
-मिलिंद भरडिया, बालरोगतज्‍ज्ञ 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

मुलाला मोबाईलची सवय लागली असून, मुलांच्या विकासासाठी शाळेत होणारे विविध उपक्रम बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणाचा परिणाम मुलावर जाणवत आहे. मुलांच्या विकासासाठी लवकरच शाळा सुरू कराव्यात. 
- धनाजी पाटोळे, पालक