यंंदा थेट शेताच्या बांधावर पार पडला कृषी महोत्सव; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लखमापूर(नाशिक) : दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग, कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २२ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशात उत्साहपूर्ण वातावरणात जागतिक कृषी महोत्सवास प्रारंभ झाला. रविवारी (ता. २४) नांदगाव तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी महोत्सव पार पडला. या वेळी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना विविध माहिती देण्यात आली. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. 

दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते मातीचे पूजन करून कृषी महोत्सवास सुरवात झाली. पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात १०० पेक्षाही अधिक ठिकाणी थेट शेताच्या बांधावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दर वर्षी नाशिक येथे होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवात लाखो शेतकरी सहभागी होतात; परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे नाशिक येथे कृषी महोत्सव न घेता थेट गावागावांत बांधावर घेण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातून हजारो तरुण सेवेकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने आयोजक आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनातून अनोखी क्रांतीच घडविली. रविवारी नांदगाव तालुक्यातील वडगाव पंगू येथे कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या वेळी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीतून स्वावलंबी शेतकरी, भाजीपाल्यातून आर्थिक समृद्धी, भारतीय गायींचे संवर्धन व संगोपन, आध्यात्मिक/प्राचीन शेती, कृषी जोड व प्रक्रिया उद्योग, विषमुक्त परसबाग, देशी बीज संवर्धन अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

सोशल डिस्टन्सिंगचे पालन... 

कोरोनासंदर्भातील अडचणी लक्षात घेऊन या कृषी महोत्सवात सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतत पालन करण्यात आले होते. तोंडाला मास्क लावणे, योग्य प्रकारे सॅनिटायझरचा वापर करणे आदी बाबींचा गांभिर्याने विचार करण्यात आला होता. 

असे आहे नियोजन 

१० ते १५ गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोणत्याही एका शेताच्या बांधावर कृषी महोत्सवातील शक्य असणाऱ्या उपक्रमांचे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजन केले आहे. स्थानिक ठिकाणी होणाऱ्या पिकांनुसार व शेतीस आवश्यक साहित्यानिहाय कंपन्यांनादेखील विविध ठिकाणी सहभाग घेता येईल. एकदिवसीय कृषी महोत्सवामुळे दिवसभरात शेतकरी सोयीच्या वेळेनुसार सहभागी होतील. तसेच कृषितज्ज्ञांचे चर्चासत्र व शेतकरी वधू-वर परिचय मेळाव्याचे ऑनलाइन नियोजन केल्याने गर्दीदेखील होणार नाही. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

कृषिमाउली सत्कार... 

या महोत्सवात नैसर्गिक शेती, देशी बियाणे, गो-सेवा, गो-संवर्धन, दुग्धव्यवसाय, कृषी जोडव्यवसाय, विविध माध्यमांमधून शेतकरी विकासाचे लिखाण, कृषी शासकीय सेवा अशा विविध विषयांमध्ये आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा कृषिमाउली सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे.