नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज प्रकरणात राजकारण करण्यापेक्षा ड्रग्ज कुटुंबापर्यंत यायला सुरुवात झाली आहे. ड्रग्ज रॅकेटमध्ये (drug racket) कोण आहे याचा मुलाहिजा न बाळगता सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. हा महाराष्ट्रातील भावी पिढीच्या भविष्याचा प्रश्न आहे. पण ड्रग्ज रॅकेट (drug racket) इतके दिवस चालले कसे? याचा शोध कुणी का घेतला नाही, याचा अर्थ प्रशासकीय यंत्रणा झोपली होती का, असा प्रश्न माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमाप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणप्रश्नी थोरात म्हणाले की, जरांगे-पाटील यांच्या सभेत लोकांचे प्रतिबिंब दिसले. याबाबत कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे. आरक्षण देताना अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग काढला पाहिजे ती वस्तुस्थिती असून, त्यावर लवकर निर्णय घेतला पाहिजे. पाटील यांच्या सभेला जनता दोन दिवस आधी येऊन बसते. त्यात महिलांची संख्या प्रचंड असते. याबाबत याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर याेग्य प्रकारे मांडणी करणे महत्त्वाचे आहे.
नाशिक, नगरवर अन्याय
केवळ धरणांची संख्या जास्त असल्याने जायकवाडीला पाणी साेडणे चुकीचे आहे. नाशिक, नगर पर्जन्य छायेत येतात. समन्यायी पाणीवाटपाचे निकष ठरविताना अधिकाऱ्यांनी ठरविलेले निकष हे नाशिकसह नगर जिल्ह्यासाठी अन्यायकारक असून, निकषांची पुनर्पडताळणी हाेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आता नवीन समिती गठीत केली आहे. राजकीय नेत्यांना सर्वांचे मन सांभाळायचे असते. समन्यायी पाणीवाटपाच्या नियमांची अंमलबजावणी करताना ते सर्वांसाठी समान असायला हवे, असेही शेवटी थोरात म्हणाले.
हेही वाचा :
- ड्रग्ज रॅकेटमधून एका आमदाराला सोळा लाखांचा हप्ता, असे सहा आमदार : संजय राऊत यांचा आरोप
- Anandacha Shidha: दिवाळीसाठीचा ‘आनंदाचा शिधा’ बुधवारपासून मिळणार!; जिल्ह्यात 5 लाख 65 हजार 796 कार्डधारकांना लाभ
- Maharashtra Rain forecast : कोकण, मध्य महाराष्ट्रात 2 दिवस पावसाचा अंदाज
The post यंत्रणा झोपली होती का? ड्रग्ज रॅकेटवरुन बाळासाहेब थोरात यांचा सवाल appeared first on पुढारी.