यंदा कारागृह विभागाचा महसूल घटणार! कच्च्या मालाअभावी उत्पादने बंद

नाशिक रोड : लॉकडाउनमुळे कारागृह विभागाने कच्च्या मालाचा पुरवठा केला नाही, त्याचप्रमाणे कलाकुसर करणाऱ्या कैद्यांना रजेवर सोडण्यात आले. त्यामुळे कारखाना विभागातील उत्पादन सध्या कमी होत असून, यंदा कारागृह विभागाचा महसूल कमी होणार आहे. राज्यातील सर्वच कारागृहांत ही परिस्थिती असून, नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातील विक्री केंद्र सध्या ओस पडले आहे. 

नाशिक रोड कारागृहात पैठणी तयार करणे, साबण, फिनाईल, बेकरी उत्पादन, सतरंजा, कपडे तयार करणे, कलाकुसर व लाकडी वस्तू तयार करणे असे नऊ प्रकारचे उद्योग कारखाना विभागात चालत होते. मात्र लॉकडाउनच्या दरम्यान कच्च्या मालाचा पुरवठा बंद असल्याने सध्या साबण, बेकरी, फिनाईल, कपडे व इतर कलाकुसरीचे उद्योग बंद पडले आहेत. पर्यायाने कारागृहाबाहेर मांडण्यात आलेले सरकारी वस्तू विक्री केंद्र सध्या ओस पडले आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रातील ३६ कारागृह विभागातील कारखाना विभागाची आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

सध्या कैदी संख्या दोन हजार २०० च्या दरम्यान आहे. त्यातील कारागृह विभागात केवळ दीडशे ते दोनशे लोक काम करीत आहेत. लॉकडाउनच्या आधी जवळपास तीन हजार कैदी संख्या होती. त्यातील आठशे लोक कारखाना विभागात वेगवेगळ्या प्रकारची कामे करीत होती. सध्या केवळ दीडशे ते दोनशे लोक कारखाना विभागात मोजक्या वस्तूनिर्मिती करीत असून, याचा फटका कारागृहाच्या महसूलला असणार आहे. पर्यायाने कैद्यांचा रोजगारही कमी झाला आहे. अनेक कैद्यांना कोरोना काळात रजेवर सोडण्यात आले आहे. त्यामुळे कलाकुसर करणारे अनेक कैदी कारागृहाबाहेर गेल्यामुळे येथील उद्योग सध्या बंद अवस्थेत आहेत. राज्यात नागपूर विभागात तीन, मुंबई विभागात दोन, पुणे विभागात तीन, औरंगाबाद विभागात तीन असे कारखाना विभाग आहेत. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

कच्च्या मालाअभावी काही उद्योग बंद असून, कैदी रजेवर गेले आहेत. त्यामुळे साबण, फिनाईल, बेकरी व इतर उद्योग बंद आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार लवकरच हे उद्योग सुरू होतील. 
- एस. ए. गिते, कारखाना विभाग