यंदा तीळ-गुळाचा गोडवा कमी! दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले 

जुनीशेमळी (जि.नाशिक) : मकरसंक्रांत सण दोन दिवसांवर आला असून, सणासाठी लागणारे तीळ, गूळ, साखर, गोडेतेल हे साहित्य बाजारात दाखल झाले आहे. मात्र या वस्तूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या सणावर ‘संक्रात’ आली आहे. गेले वर्षभर कोरोनाचा संसर्गामुळे सर्वसामान्यांमध्ये सण-उत्सव साजरा करण्यास निरुत्साह दिसून आला.

तीळ-गुळाचा गोडवा कमी 

कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने सण साजरे करण्यास मन धजावत असले तरी वाढत्या महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. मकरसंक्रांतीला तीळ-गूळ आणि तिळाच्या लाडवाला महत्त्व असते. कोरोनामुळे बाहेरील पदार्थ खरेदी करण्याचा कल कमी झाल्याने, तसेच महागाई वाढल्याने घरातच तीळ- गूळ बनविण्यास महिला प्राधान्य देत आहेत. त्यादृष्टीने महिलांनी तयारी सुरू केली आहे. तिळगुळाचे लाडू बनविण्यासाठी लागणारे मातीची सुपडे बाजारात दाखल झाले आहेत. मनातील दुरावा दूर करण्यासाठी संक्रांतीला एकमेकींना हळदी-कुंकवाचे वाण देतात. मात्र महिलांच्या वाणावरही महागाईचे सावट आहे. महागाईमुळे घरातील वस्तूंचे वाण करून वाटण्याचा महिलांचा मानस आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले 

गावरान तीळ - ११० ते १२० रुपये 
पॉलिश पांढरे तीळ - १३५ ते १४० 
चिक्कीचा गूळ - ५० ते ६० रुपये 
साखर - ३५ ते ३८ रुपये 
गोडेतेल - १३० ते १३५ रुपये 

रेजिमेड तीळ-गूळ घेतात. मात्र या वेळेस कोरोनामुळे घरीच बनविणार आहोत. किंमत वाढल्या तरीपण सण साजरा करावाच लागणार आहे. -पूजा बागूल गृहिणी, जुनीशेमळी 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा 

तीळ, गोडेतेल भावामध्ये वर्षाच्या तुलनेत या वर्षी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक वर्गाचे बजेट चुकणार आहे. -बाळासाहेब बागूल, दुकानदार, जुनीशेमळी