यंदा सोने लुटताना बसेल खिशाला झळ; दर ६२ हजारांच्या नजीक

सोने - चांदी दर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेखुरे सोने लुटताना खिशाला मोठी झळ बसणार आहे. सोने दरात सातत्याने वाढ होत असून, दर ६२ हजारांच्या नजीक पोहोचले आहेत. इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धाचा परिणाम सोने दरवाढीवर होत आहे. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक समजली जात असल्याने, युद्धामुळे इतर ठिकाणची गुंतवणूक ही सोन्यात वळती झाली आहे. इतरही फंड हे सोन्याकडे वळले आहेत. (Gold Rate)

दसऱ्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यानंतर येणाऱ्या दिवळीतही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. त्यामुळे पुढील काही दिवसात सराफ बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. परंतु सोने दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे व्यावसायिकांमध्ये काहीशी चिंता आहे. पितृपक्षात सोने दर बऱ्यापैकी आटोक्यात होता. त्यामुळे सणासुदीत दर कमी असेल चित्र होते. मात्र, ईस्त्राइल-हमास यांच्यातील युद्धाचा सोने बाजारावर मोठा परिणाम झाल्याने दरांनी अचानकच उसळी घेतली आहे. रविवारी २२ कॅरेट १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर ५६ हजार ६३० रुपये इतका नोंदविला गेला. तर २४ कॅरेट, १० ग्रॅमसाठी ६१ हजार ७८० इतका दर नोंदविला गेला. दरम्यान, सोने दरात वाढ झाली असली तरी, सध्याचे उत्साहाचे वातावरण बघता दसरा-दिवाळीत सोने खरेदीसाठी ग्राहकांकडून गर्दी केली जाईल, अशी अपेक्षा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पितृपक्षात ५७ हजार भाव

पितृपक्षात २४ कॅरेट सोन्याचा दर ५७ हजार इतका खाली आला होता. दसरा-दिवाळीत तो आणखी खाली येणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे अचानकच सोने दरात मोठी वाढ होत आहे. दिवाळीपर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

चांदी ७५ हजार पार

सोने दरवाढीबरोबरच चांदीलाही चकाकी मिळत आहे. रविवारी एक किलो चांदीचा दर ७५ हजार ३०० रुपये नोंदविला गेला. पितृपक्षात चांदी ७० हजाराच्या खाली आली होती. मात्र, जागतिक घडामोडीचा चांदीच्या दरांवरही परिणाम झाला.

हेही वाचा :

The post यंदा सोने लुटताना बसेल खिशाला झळ; दर ६२ हजारांच्या नजीक appeared first on पुढारी.