सिन्नर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
नांदूरशिंगोटे येथील शीतल दामोदर नन्नावरे हिने प्रतिकूल परिस्थितीत हतबल न होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले असून, तिने नगर परिषदेच्या लेखापरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. अभ्यासिकेत काम करून मिळविलेल्या यशामुळे परिसरात शीतलचे कौतुक होत आहे.
शीतलनन्नावरे हिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण व्ही. पी. नाईक विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. तिने वाणिज्य विषयात पदवी घेऊन महाविद्यालयात पहिला येण्याचा मान मिळवला आणि शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. एम. कॉम. करण्यासाठी पुणे विद्यापीठात जाण्यासाठी शिक्षक गुजराथी यांनी मदत केली, पुणे विद्यापीठात एम, कॉम. चे शिक्षण सुरू असताना खर्च भागविण्यासाठी ‘कमवा आणि शिका’ योजनेमध्ये काम केले. विद्यापीठातही चांगले यश मिळाले.
त्यानंतर एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. पण आर्थिक परिस्थितीमुळे शहरामध्ये राहण्याची समस्या असताना एमपीएससीचा क्लास लावण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे वैयक्तिक अभ्यास सुरू केला. अपेक्षित निकाल काही येत नसल्याने मन अस्वस्थ व्हायचे. घरी पैसे मागावे तरी कसे असा विचार करीत २०१८ मध्ये शीतल गावाकडे आली. स्पर्धा परीक्षेसाठीची तयारी करत असताना शीतल हिने नोव्हेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. सदर परीक्षेचा १० जून रोजी निकाल लागला व तिची नगर परिषदेची लेखापरीक्षक म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल आई- वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याचे समाधान झाल्याचे ती सांगते.
कुटुंबीयांचे मोलाचे पाठबळ
२०१९ ला तलाठी पदाने थोडक्यात हलकावणी दिली. कुटुंबीय आणि नातेवाइकांनी दिलासा देत अभ्यास सुरूच ठेवण्याचा सल्ला दिला, वह्या, पुस्तके, टेस्ट सिरीज वगैरेसाठी पैसे नव्हते. मग, अभ्यासिकेत स्वच्छता राखण्याचे काम सुरू केले. महिन्याला दीन हजार रुपयांचे काम मिळाले. अभ्यास, काम, वरच्या जवाबदाऱ्या अशी तारेवरची कसरत करीत अभ्यासही सुरूच ठेवला.
मित्र-मैत्रिणींनो स्पधों परीक्षेचा अभ्यास करताना एक दिवस असा येईल, स्वतःचीच कीव कराची वाटेल. परिस्थितीवर रडायला येईल, पण, त्यावेळी हार मानू नका. लढत राहा. एक दिवस यशामुळे आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतील. – शीतल नन्नावरे.
The post यशाचे कौतुक! अभ्यासिकेत काम करून लेखापरीक्षक पदाला गवसणी appeared first on पुढारी.