यांना ब्राह्मण कोण म्हणणार? त्या मेसेजवरून भुजबळ संतापले

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

संभाजी भिडे प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना व्हॉटस‌् ॲपवरून धमक्यांचे मेसेज येत आहेत. यावर भुजबळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना ‘मी ब्राह्मण आहे म्हणतात आणि घाणेरड्या भाषेत शिव्या देता, यांना ब्राह्मण कोण म्हणणार?’ असा संतप्त सवाल केला.

संभाजी भिडे, ब्राह्मण समाज आणि सरस्वती पूजा या विषयावर मंगळवारी (दि.२२) भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ‘संभाजी भिडे मनोहर कुलकर्णी आहेत हे खरं आहे की नाही ते सांगा. ते जर मनोहर कुलकर्णी असतील, तर संभाजींचे नाव वापरून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य का करतात? खास त्याच्यासाठी त्यांनी संभाजी नाव घेतलय का? त्यांचे खर नाव काय आहे? सहसा अशी नाव या समाजामध्ये नसतात. एवढच माझे म्हणणे होते’, असे भुजबळ म्हणाले.

‘सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत मी म्हणालो होतो, आमचे हे देव आहेत. शाळेत, शिक्षणातील त्यांचे कर्तृत्व आपण पुढे आणले पाहिजे. घरात कोणाची पूजा करण्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. माझे मत मांडण्याचा मला अधिकार आहे’, असे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले. मी फक्त शिव्या देणाऱ्यांबद्दल बोलत आहे. मी चुकलो असेन, तर पोलिसांनी माझ्याविरुद्ध कारवाई करावी. कोणी चुकत असेल, कायदा हातात घेत असेल, तर त्याच्याविरुद्ध पोलिस कारवाई करतील, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

धमक्यांना मी भीक घालत नाही!

महात्मा फुले समाजसुधारणेचे काम करत होते, त्यावेळी ब्राह्मण समाजातील समाजसुधारकांनी त्यांना मदत केली होती. कर्मठ ब्राह्मण्यवाद परिस्थिती का होती? हे मी नेहमी सांगतो. शाळा, कॉलेजच्या मुलांसमोर बोलणे स्वाभाविक आहे. त्यात कोणाला राग येण्याचे कारण नाही. धमक्यांना मी भीक घालत नाही, असेही भुजबळ यांनी सुनावले.

हेही वाचा :

The post यांना ब्राह्मण कोण म्हणणार? त्या मेसेजवरून भुजबळ संतापले appeared first on पुढारी.