यापुढे ‘चलता है’ हे चालणार नाही. निर्बंध तोडले तर याद राखा – छगन भुजबळ

नाशिक : जमाव होईल अशा सभा, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध राहतील. लग्नांसाठीचे निर्बंध तोडल्यास कडक कारवाई केली जाईल. उपस्थितांवरही कारवाई होईल. यापुढे ‘चलता है’ हे चालणार नाही. पवित्र रमजान महिन्यात पाचपेक्षा कमी बांधवांना नमाजपठण करता येईल. याशिवाय पोलिसांच्या मदतीसाठी गृहरक्षक दलाच्या जवानांना सेवेत घेतले जाईल. ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधाच्या परिणामांचे अवलोकन करून पुढील धोरण स्वीकारले जाईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

नाशिकप्रमाणेच राज्यात ‘वीकेंड लॉकडाऊन’

कोरोना विषाणू संसर्ग फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकप्रमाणेच राज्यात ‘वीकेंड लॉकडाऊन’ लागू करण्याचा निर्णय रविवारी (ता. ४) झालेल्या मंत्रिमंडळाच्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला. तसेच, रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत राज्यभर संचारबंदी राहील. मात्र, राज्यात लॉकडाउन लागू होणार नाही. त्याऐवजी ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू राहतील. त्याची अंमलबजावणी सोमवारी (ता. ५) मध्यरात्री बारापासून सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

जमावबंदीचा १४४ चा आदेश लागू होईल
मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भुजबळ उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की कडक निर्बंधाची नियमावली सोमवारी सरकारतर्फे जारी केली जाईल. जमावबंदीचा १४४ चा आदेश लागू होईल. कारखाने, जीवनावश्‍यक वस्तूंचे व्यवसाय सुरू राहतील. मात्र, शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, लसीकरण करणे बंधनकारक राहील. मॉल, शाळा-महाविद्यालये बंद राहतील. त्याचवेळी लसीकरण वाढवण्यावर भर दिला जाईल. ई-कॉमर्स सुरू राहील. सूक्ष्म कन्टेन्मेंट झोनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. समारंभ बंद राहणार असताना निवासी सोसायट्यांमध्ये फलक लावला जाईल. निर्बंध तोडल्यास सोसायट्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड 
सार्वजनिक वाहतुकीसाठी पन्नास टक्के प्रवाशांचे बंधन राहील. त्याचवेळी चालक-वाहक, डिलिव्हरी बॉय, कामगार, कर्मचारी अशा लोकांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्‍यक आहे. त्याचवेळी मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड केला जाईल. कार्यालयीन कामकाजात ‘वर्क फ्रॉम होम’वर भर दिला जावा. अत्यावश्‍यक आस्थापनांसह सरकारी कार्यालयांमध्ये पन्नास टक्के उपस्थिती ठेवणे आवश्‍यक असेल. मंत्रालयासह इतर ठिकाणी ‘व्हिजिटर' थांबवण्यात येतील. चित्रपटगृह, नाटक, वॉटरपार्क अशी गर्दीची ठिकाणे बंद राहतील. चित्रपटांचे चित्रीकरण सुरू राहील. मात्र मोठ्या गर्दीचे चित्रीकरण पुढे ढकलण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बार-हॉटेल, केश कर्तनालय बंद राहतील. पार्सलला परवानगी राहील. मोठ्या हॉटेलमधील रेस्टॉरंट सुरू राहतील. बांधकामांसाठी आवश्‍यक कामगारांच्या निवासासह इतर योग्य सुविधा करत असताना लसीकरण करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, शारीरिक अंतर राखणे महत्त्वाचे असेल, असेही  भुजबळ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे उपस्थित होते. 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

 
नाशिक शहर आणि जिल्ह्यामधील कोरोना उपाययोजनांच्या आढाव्यासंदर्भात आज यंत्रणांची बैठक होईल. मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे यंत्रणांचा आढावा घेण्यात येईल. त्यात कसूर आढळल्यास निर्णय घेतले जातील. ते नाशिककरांना सांगण्यात येतील. 
-छगन भुजबळ, पालकमंत्री