या चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला : दादा भुसेंची संजय राऊतांवर टीका

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कालपर्यंत आम्ही सोबत होतो, तर चांगले होतो. आज अचानक आम्ही बाहेर आलो, तर चोर झालो का ? खरे तर याच चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

नाशिकमध्ये शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच रविवारी (दि. १९) सकाळी आमचे धनुष्य यांनी चोरले आहे. ते चोर आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला खरमरीत उत्तर ना. भुसे यांनी दिले.

ना. भुसे म्हणाले, आम्ही कालपर्यंत सोबत होतो, त्यावेळी सर्व शिवसैनिक सोबत होते, तेव्हा गुणगान गायले जात होते. मध्यंतरीच्या काळात ही घटना घडली आणि आज आमच्यावर आरोप केले जातात. जेव्हा खालच्या पातळीवर जाऊन कोणी काही बोलते, अशा व्यक्तींची कीव येते. सकाळी-सकाळी टीव्हीसमोर येऊन पोपटपंची करत सुटतात, अशी टीका यावेळी ना. भुसे यांनी केली.

चोर वगैरे म्हणून अशा पद्धतीने टीका करणे चुकीचे आहे. घरात बसून शिवसेना वाढलेली नाही. त्यासाठी अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडले आहे. अनेकांनी जिवाचे रान केले आहे. खरे म्हणजे याच चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला, असा आरोप ना. भुसे यांनी केला आहे.

हेही वाचा :

The post या चांडाळ चौकडीने शिवसेनेचा घात केला : दादा भुसेंची संजय राऊतांवर टीका appeared first on पुढारी.