युरोपमध्ये द्राक्षांच्या भावात युरोची घसरण! कमी भावामुळे ६७५ कोटींचा फटका 

नाशिक : गेल्या वर्षीच्या हंगामात पावसाने दिलेला दणका आणि कोरोनाच्या संकटामुळे बागा छाटण्याच्या बिघडलेले वेळापत्रक यामुळे यंदा मागणीच्या तुलनेत अधिक द्राक्षे बाजारात येऊ लागली आहेत. परिणामी, किलोला १५ रुपयांची घसरण झाली आहे. युरोपमध्ये पाच किलो द्राक्षांना १२ युरो भाव मिळत होता. आता निर्यातदारांना साडेनऊ युरोवर समाधान मानावे लागत आहे.

शेतकऱ्यांना ६७५ कोटींचा फटका

द्राक्षांचा ४५ दिवस चालणारा हंगाम आणि जिल्ह्यात दिवसाला दहा हजार टन द्राक्षांची होणारी काढणी, यामुळे गणित बिघडले आहे. अशातच, गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना ६७५ कोटींचा फटका बसला आहे. युरोपमध्ये १२ ते १३ टन द्राक्षे पाठविण्यासाठी गेल्या वर्षी अडीच हजार डॉलरच्या आसपास कंटेनरचे भाडे मोजावे लागत होते. हेच भाडे आता चार हजार ते साडेचार हजार डॉलरपर्यंत पोचले आहे. आतापर्यंत चार हजार ६५५ कंटेनरमधून ६० हजार ५०४ टन द्राक्षांची निर्यात झाली असून, वाढलेल्या भाड्यामुळे ७० कोटींचा भुर्दंड बसला आहे. जानेवारीमध्ये कंटेनरचे भाडे ठरलेले असायचे. ते द्राक्षांच्या हंगामापर्यंत चालायचे. आता मात्र द्राक्षे पाठविण्यासाठी एकतर निर्यातदारांना कंटेनरसाठी वाट पाहत बसावी लागते. अथवा १०० ते २०० डॉलर अधिक भाडे मोजून कंटेनर मिळवावा लागतो. मुळातच, युरोपच्या बाजारपेठेत आठवड्याला रवाना होणाऱ्या द्राक्षांचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामागे एकाच वेळी छाटणीचे प्रमाण वाढल्याचे प्रमुख कारण असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. 

महिन्यात ७५ टक्के छाटणी 
द्राक्षपंढरीत जुलै-ऑगस्टमध्ये २ ते ३ टक्के, १५ सप्टेंबरपर्यंत २०, १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत ५० ते ५५, त्यानंतर ऑक्टोबरअखेरपर्यंत २० टक्के आणि उरलेल्या बागांची छाटणी नोव्हेंबरपर्यंत व्हायची. पण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने झालेले नुकसान आणि ऐन छाटणीच्या काळातील कोरोना संसर्ग या कारणांमुळे १ ते १५ सप्टेंबर २०२० ला ४ ते ५ टक्के बागांची, तर १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२० मध्ये ७० ते ७५ टक्के बागांची छाटणी झाली. परिणामी, यंदा १५ फेब्रुवारीपासून ते २५ मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात छाटलेल्या बागांमधील द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात राहणार आहे. मुळातच १३५ दिवसांमध्ये द्राक्षांची काढणी सुरू होत असली, तरीही यंदा १७० दिवस झाले, तरीही काढणी होऊ शकलेली नाही. आता उन्हाचे चटके वाढत असल्याने मण्यांमधील साखरेचे प्रमाण झपकन वाढत असल्याने झाडांवर द्राक्षे ठेवणे शेतकऱ्यांना शक्य होईना. याच संदर्भात सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे उदाहरण खूपच बोलके आहे. जानेवारीअखेरपर्यंत गेल्या वर्षी कंपनीने १७० कंटेनर द्राक्षांची निर्यात केली होती. ती यंदा २९ कंटेनरची झाली. तसेच गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ४०० कंटेनरची निर्यात केली होती. यंदा ७०० कंटेनरची निर्यात झाली आहे. यंदा जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारपेठेत ४० ते ४५, तर निर्यातीसाठी ७० ते ७५ रुपये किलो भावाने द्राक्षांची खरेदी झाली. आता देशांतर्गत आणि निर्यातीसाठीचे भाव १५ ते २० रुपयांनी घसरले आहेत. गेल्या वर्षीच्या हंगामात पावसाने नुकसान केल्याने जिल्ह्यातील बागांमधील ४० टक्के द्राक्षांचे नुकसान झाले होते. त्यामुळे निर्यातीसाठी द्राक्षांचे प्रमाण कमी राहिले होते. 

एप्रिल-मेमध्ये मिळणार चांगला भाव 
द्राक्षांची विक्रीव्यवस्था जानेवारी ते मे या कालावधीत विभागली जाणे अपेक्षित आहे. पण यंदा एकाच वेळी द्राक्षे विक्रीसाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे. आंबे बाजारात येण्यासाठी मे उजाडतो. यंदा डाळिंबाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने डाळिंबे फारसे विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. नेमक्या अशा उन्हाचा तडाखा वाढत असताना द्राक्षांसाठी चांगली मागणी राहील. एप्रिलपासून दीड महिने देशांतर्गत आणि परदेशात द्राक्षांना मागणी राहणार असताना शेतकऱ्यांकडे तेवढी द्राक्षे उपलब्ध नसतील. ‘पॅनिक सेल’मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी साठवणूक व्हायला हवी. 

साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न
प्रत्यक्षात जिल्ह्यात ५० हजार टनांची साठवणूक होऊ शकते. सध्याची काढणी पाहता पाच दिवस द्राक्षे ठेवता येतील अशी स्थिती आहे. त्यामुळे आताची आपत्ती लक्षात घेऊन साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक बनले आहे, असे सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.