धुळे : पुढारी वृत्तसेवा ; दिल्ली-धुळे-मुंबई कॉरिडॉरच्या माध्यमातून फुड प्रोसेसिंग, टॅक्सटाईल्स मिल तसेच इतर क्षेत्रात नवयुवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत या क्षेत्रासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे आवाहन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे.
जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज झाली. या बैठकीत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुभाष भामरे होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सचिन बोडके, अशासकीय सदस्य तथा माजी सभापती अरविंद जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खासदार डॉ. भामरे म्हणाले, धुळे जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदनाचा योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना देण्यात यावा. धुळे जिल्ह्यात कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागाने शिबीराचे आयोजन करावे. नियमित लसीकरण कार्यक्रमातंर्गत गरोदर माता व बालकांचे 100 टक्के लसीकरण करावे. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षांनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करावे. प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या लाभापासूच वंचित असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. सुकन्या समृद्धी योजनेची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करावी. दिल्ली-धुळे-मुंबई कॉरिडॉरच्या माध्यमातून फुड प्रोसेसिंग, टॅक्सटाईल्स मिल तसेच इतर क्षेत्रात नवयुवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत या क्षेत्रासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे. धुळे जिल्ह्यातील साक्री-25, शिरपूर-2, धुळे-3, शिंदखेडा-8 अशा एकूण 38 नवीन मोबाईल टॉवरच्या कामांना वेग देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
यावेळी प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना, बेटी बचाव,बेटी पढाओ योजना, एकात्मिक बाल विकास योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री उज्जवला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधेंशी संबंधीत दुरसंचार, रेल्वे, महामार्ग, प्रधानमंत्री खणीज क्षेत्र कल्याण योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
प्रारभी मान्यवरांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत 3 लाभार्थीच्या वारसांना प्रातिनिधीक स्वरुपात 2 लक्ष रुपयांचा धनादेश वितरण करण्यात आला.
हेही वाचा :
- उघड्या पडलेल्या गणेशमूर्ती पुन्हा केल्या विसर्जित
- सातारा: म्होप्रे येथे सव्वा लाखाचा गांजा पकडला
- अखेर राजगडावर लागले मधमाश्यांच्या पोळांबाबत खबरदारीचे फलक
The post युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे : खा. डॉ. सुभाष भामरे appeared first on पुढारी.