युवराज संभाजीराजे : छत्रपतींच्या स्वप्नातले स्वराज्य निर्माण करणार

Sambhajiraje www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून युवकांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातले स्वराज्य निर्माणाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे. सिन्नर तालुक्यातील प्रतिसाद हा अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी केले.

तालुक्यातील विविध ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सायंकाळी जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने ठाणगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजाभाऊ वाजे, स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर, गणेश कदम, छावा संघटनेचे विलास पांगारकर, विशाल पांगारकर, सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार उपस्थित होते. सुरुवातीला संभाजीराजे यांच्या हस्ते गावात स्वराज्य संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने संभाजीराजेंची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामस्थांच्या वतीने जनसेवा संस्थेचे मुकुंदराव काकड, संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर, सरपंच सीमा शिंदे, माजी सरपंच नामदेव शिंदे, विकास सोसायटीचे चेअरमन अमित पानसरे यांच्या हस्ते युवराज संभाजीराजे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जनसेवा संस्थेकडून आजवर केलेले समाजहिताचे काम मोठे असून त्यांच्याकडून भविष्यात शेतकरी, गोरगरीब, विद्यार्थ्यांसाठी अजून मोठे काम घडो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. जनसेवा संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल संभाजीराजे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर, मुकुंदराव काकड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अर्जुन आव्हाड, वसंत आव्हाड, संजय शिंदे, शंकर आमले, सागर भोर, सचिन रायजादे, भगवान शिरसाठ, गणेश शिंदे, प्रतीक शिंदे, योगेश शिंदे, बबन काकड, डी. एम. आव्हाड, गोकुळ काकड, राजेंद्र काकड, गोकुळ आंधळे, शिवाजी काकड, गणेश शिंदे, उपसरपंच शेखर कर्डिले, संजय शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

‘शेतकरी, बेरोजगारी प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे’
सभेत बोलताना संभाजीराजे यांनी शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून, सरकारकडून त्यांना अद्याप अपेक्षित मदत पोहोचली नसल्याचे ते म्हणाले. राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत आहे. तरुणांना नोकर्‍या उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post युवराज संभाजीराजे : छत्रपतींच्या स्वप्नातले स्वराज्य निर्माण करणार appeared first on पुढारी.