युवराज संभाजीराजे : ‘समृद्धी’च्या बाजूने शेतकर्‍यांना 10 फूट रस्ता ठेवावा

sambhajiraje www.pudhari.news

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी रस्ते शिल्लक न राहिल्याने त्यांची गैरसोय झाली आहे. जमिनी विकत घेतल्या तरी सदरच्या जमिनी या शेतकर्‍यांच्या आहेत. रस्त्याच्या बाजूने शेतकर्‍यांसाठी दहा फुटी रस्ता हा ठेवावाच लागेल. यासाठी आपण येत्या चार तारखेला दिल्ली येथे रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तालुक्यातील रस्त्यांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन ‘स्वराज्य’ संस्थापक माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी दिले.

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे स्व. सुंदराबाई नामदेव पांगारकर यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त व गोशाळा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शेतकरी व कामगार मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, छावाचे संस्थापक किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, स्वराज्यचे प्रवक्ते करण गायकर, युवा नेते उदय सांगळे, भिकन शेळके, रमेश पांगरकर, शत्रुघ्न झोंबाड, योगेश केवारे, काळे पाटील, अ‍ॅड. मयूर पांगारकर, विशाल पांगारकर, विजय काटे आदींसह मान्यवर उपस्थित होते. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते पांगरी येथे स्वराज्य संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.विलास पांगारकर यांनी समृद्धीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संभाजीराजे यांना साकडे घातले. स्वराज्यचे प्रवक्ते करण गायकर यांनी या भागातील शेतकर्‍यांच्या विविध समस्यांना हात घालून युवराज संभाजीराजे यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले. शांतिगिरी महाराज यांनी प्रवचनात आईची महती पटवून दिली. त्यांनी गोशाळेची पाहणी करत गायींचे पूजन करत त्यांना फळे भरवली. किशोर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. मयूर पांगारकर यांनी सूत्रसंचालन केले. विलास पांगरकर यांनी आभार मानले. यावेळी कामगार, शेतकरी मेाठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार…
सिन्नर तालुक्यातील दौर्‍यामध्ये केवळ सुसज्ज बसस्थानक, तहसील कार्यालय दिसले. तालुक्यात रस्त्यांची पूर्ण वाट लागलेली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमधून सकाळपासून मार्गक्रमण केले. मात्र, प्रत्येक ठिकाणी गावागावात जल्लोषात स्वागत केले. त्यामुळे त्या खड्ड्यांचा मला विसर पडला, असे म्हणावे लागेल. मात्र, या ठिकाणी पांगरीकरांनी रस्त्याबाबत प्रश्न मांडल्यानंतर तो सोडविण्यासाठी मी नक्कीच केंद्र शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post युवराज संभाजीराजे : ‘समृद्धी’च्या बाजूने शेतकर्‍यांना 10 फूट रस्ता ठेवावा appeared first on पुढारी.