युवासेनेत जिल्हाप्रमुख बदलावरून घमासान; शिवसैनिकांत ‘अर्थ’पूर्ण चर्चेला उधाण 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : राजकीय पक्ष सत्तेत आला की त्यातील पदाधिकाऱ्यांचे महत्त्व अनन्य साधारण वाढते. यात शिवसेना व भाजपमध्ये तर पक्ष पदाधिकाऱ्यांचे महत्त्व जरा अधिकच आहे. शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेच्या पदाधिकारी बदलावरून सध्या जोरदार घमासान रंगले आहे. थेट वरिष्ठ पातळीवर हा वाद पोहचला असून, नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करताना आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगली आहे. 

शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे सरकारमध्ये मंत्री झाल्यापासून पक्षविस्ताराकडे काहीअंशी दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यांनी सहकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपविली आहे. याचा विपरित परिणाम नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील युवासेनेच्या जिल्हाप्रमुख निवडीदरम्यान दिसून आला. यात दिंडोरी व निफाडमध्ये नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत वादंग उफाळून आले आहेत. मुलाखती घेऊन पद नेमणुकीची पद्धत आहे. या वेळी मात्र युवासेनेचे संपर्कप्रमुख निलेश गवळी यांनी तो शिरस्ता मोडून थेट नियुक्त्या केल्या. त्या वादात सापडल्या असून, शिवसैनिकांमध्ये गटबाजी होऊन वादंग होण्याची शक्यता आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मागणी पूर्ण न झाल्याने जुन्या पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी केल्याचे बोलले जात आहे. 

वरिष्ठांकडे दाद... 

युवासेनेच्या नियुक्त्या झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. पक्षाचे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून दाद मागितली आहे. विश्‍वासात न घेता पदांची खैरात वाटली गेल्याचे या पत्रप्रपंचात नमूद करण्यात आले आहे. नियुक्त्या करताना आर्थिक घोडेबाजार होऊन पदाची खिरापत वाटली गेल्याची चर्चा आहे. उफाळलेला वाद शमविण्यासाठी पक्षश्रेष्ठी पुढाकार घेणार का, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, युवासेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश गवळी यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

युवासेनेच्या पदाधिकारी नेमणुकांमध्ये शिवसैनिकांची नाराजी झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. याबाबतच्या तक्रारीप्राप्त झाल्या असून, वरिष्ठांना त्या कळविल्या आहेत. 
- भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख, शिवसेना, नाशिक 

युवासेनेचे जुने जिल्हाप्रमुख व पदाधिकारी हटवून नव्या नियुक्त्या करताना स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले गेले नाही. त्यामुळे असंतोष उफाळून आला आहे. नियुक्त्या रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. 
- सुनील पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना   

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा