यूजीसी-नेट परीक्षेचा निकाल जाहीर; सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ३६ हजार १३८ उमेदवार पात्र

नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे घेण्यात आलेल्‍या यूजीसी नेट जून २०२० परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्‍या २४ सप्‍टेंबर ते १३ नोव्‍हेंबर या कालावधीत बारा दिवस दोन सत्रांमध्ये देशभरातील २२५ शहरांतील एक हजार ११९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. वेगवेगळ्या ८१ विषयांतून परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली. या परीक्षेच्‍या माध्यमातून जेआरएफ आणि सहाय्यक प्राध्यापकपदासाठी उमेदवारांनी पात्रता मिळविली आहे.

जेआरएफ, सहाय्यक प्राध्यापकपदासाठी मिळाली पात्रता

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे अन्‍य परीक्षांप्रमाणे यूजीसी नेट जून २०२० ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार जूनमध्ये घेता आली नव्‍हती. परंतु परिस्‍थितीत सुधारणा झाल्‍यानंतर ही परीक्षा सप्‍टेंबरअखेरीस घेण्यात आली. या परीक्षेसाठी सहाय्यक प्राध्यापकपदासाठी देशभरातून दोन लाख ५९ हजार ७३४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र कोरोनाच्‍या प्रादुर्भावाचा परिणाम उपस्‍थितीवर जाणवला होता. एक लाख ४० हजार ४७९ परीक्षार्थींनीच ही परीक्षा दिली होती. या परीक्षार्थींमधून चार हजार ८४८ उमेदवार पात्र ठरविण्यात आले आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ३६ हजार १३८ पात्र

जेआरएफ व सहाय्यक प्राध्यापक या परीक्षेसाठी सहा लाख एक हजार २४२ उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु तीन लाख ८६ हजार २२८ उमेदवार परीक्षेला समोरे गेले होते. यातून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ३६ हजार १३८, तर जेआरएफ व सहाय्यक प्राध्यापकपदाच्‍या परीक्षेत सहा हजार १७१ उमेदवार पात्र ठरले आहेत. ही परीक्षा संगणकावर आधारित घेण्यात आली होती. तर निकाल सोमवारी (ता. ३०) रात्री उशिरा जाहीर केला आहे.

फेलोशिपसाठीची यादी जाहीर

पात्र ठरलेल्‍या एकूण ४७ हजार १५७ उमेदवारांमधून निवडक उमेदवारांना फेलोशिपला लाभ मिळणार आहे. यात चार हजार २९ उमेदवारांना नॅशनल फेलोशिप फॉर शेड्युल्‍ड कास्‍ट स्‍टुडंट (एनएफएससी), ४३१ उमेदवारांना नॅशनल फेलोशिप फॉर ऑदर बॅकवर्ड क्‍लासेस (एनएफओबीसी), तर ४७५ उमेदवारांना मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप फॉर मायनॉरिटी स्‍टुडंट्‌स (एमएएनएफ)चा लाभ मिळेल. फेलोशिपसाठी पात्र उमेदवारांच्‍या नावांची यादीदेखील जाहीर करण्यात आली आहे.