Site icon

‘यूपीएससी’मध्ये चमकले नाशिकचे तीन विद्यार्थी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी (दि. २३) दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. गेल्या वर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांनी यूपीएससीतील यशाची परंपरा कायम ठेवत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

यूपीएससीकडून सप्टेंबर २०२२ मध्ये लेखी परीक्षा पार पडल्या होत्या. आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती. लेखी परीक्षा, मुलाखती आणि व्यक्तिमत्व चाचणीच्या आधारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ९९३ उमेदवार यशस्वी ठरले आहे. त्यात नाशिकच्या तिघांचा समावेश आहे. गौरव गंगाधर कायदेपाटील हा १४६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. गौरवने आयटी कंपनीच्या मोठ्या वेतनावर पाणी सोडत ‘आयएएस’ होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. त्याचे वडील बीवायके महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत असून, आईनेही विद्यार्थ्यांना धडे दिले आहेत. भाऊ चैतन्य हा केटीएचएम महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहे. गौरवने चौथ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण होण्याची किमया साधली आहे.

स्वप्निल-दिव्याच्या रॅंकेत सुधारणा : गेल्या वर्षी स्वप्निल जगन्नाथ पवार याने यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ६३५ वी रैंक मिळवत यशाला गवसणी घातली. तो सध्या एनपीएत असून, यंदा स्वप्निलने २८७ रैंक मिळवित आयएएस क्षेत्रात झेप घेतली. तर यापूर्वी ३३८ रैंक मिळविणा-या दिव्या अर्जुन गुंडे हिने यंदा क्रमवारीत मोठी सुधारणा करत २६५ क्रमांकावर झेप घेतली.

मोठ्या वेतनावर सोडले पाणी : गौरव कायदेपाटील याने सिहगड कॉलेज पुणे येथून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर टिबको तसेच इन्फोसिस यांसारख्या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या वेतनाची नोकरी करत होता. मात्र, त्याला यूपीएससीचे स्वप्न स्वस्त बसू देत नव्हते. त्यामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षांचे वीकेण्ड क्लासेस जॉइन केले. सन २०२१ मध्ये त्याने दिल्ली गाठत परीक्षेची तयारी केली.

यंदाही मुलींनी मारली बाजी

अंतिम निकालात एकूण ९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३४५ विद्यार्थी खुल्या गटातून, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) ९९, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) २६३, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) १५४ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून ७२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात पहिला क्रमांक पटकावलेली कश्मिरा देशात २५ वी आली आहे. तिसन्या प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली. ती व्यवसायाने डेंटिस्ट असून, आपली डॉक्टरी सांभाळून तिने यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला होता. तिचे पहिले प्राधान्य आयएएसला आहे.

हेही वाचा :

The post 'यूपीएससी'मध्ये चमकले नाशिकचे तीन विद्यार्थी appeared first on पुढारी.

Exit mobile version