यूपीएससी मुख्य परीक्षा अन् मुलाखत तयारीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या आदिवासी उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी, असे एकूण २६ हजार रुपये देण्यात येतील. आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी ही माहिती दिली. 

५० उमेदवारांना मिळणार ही आर्थिक मदत
आदिवासी विद्यार्थ्यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये आणि प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने ही योजना सुरू केली. योजनेंतर्गत यूपीएससीच्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या २५, अशा आदिवासी ५० उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. २०२०-२१ पासून ही योजना लागू होणार असून, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला