Site icon

येवला अन् नगरसूल स्थानकाचा रेल्वेच्या अमृत योजनेत समावेश करा : छगन भुजबळ 

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील नगरसुल रेल्वे स्थानक हे प्रवासी व मालवाहतुकीसाठी महत्वाच्या नगरसूल अन् येवला रेल्वेस्थानकाचा भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेमध्ये समावेश करावा. या रेल्वेस्थानकांचा प्राधान्याने विकास करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भुजबळ यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.
भुजबळ म्हणाले, भारतीय रेल्वे बाबत देशातील २४७ स्थानकांची पुनर्विकासासाठी निवड होणार आहे. यामध्ये रेल्वे प्रशासन प्रत्येक रेल्वे विभागातून प्रत्येकी दोन रेल्वे स्थानक निवडून त्यांचा विकास पहिल्या टप्प्यात करणार आहे. त्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून नगरसूल स्थानकाचा विकास प्राधान्याने करावा. त्यामुळे येवल्याची ‘पैठणी’ ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ धोरणांतर्गत नगरसूल स्थानकावर प्रोत्साहित करण्यात येईल. तसेच भारतीय रेल्वे योजनेतंर्गत छोट्या एक हजार स्थानकांचा विकास करणार आहे. या योजनेतून प्रत्येक विभागातून १५ स्थानके निवडण्यात येणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून येवला स्थानकाचा समावेश करावा. येवला स्थानकाचा विकास करताना ‘प्लॅटफॉर्म-२’ चा विकास व्हावा. तसेच याठिकाणी ‘फूट ओवर ब्रीज” विकसित करावा. तसेच मालाची साठवून करण्यासाठी ‘गुड्स शेड’ उभारून ‘गुड्स प्लॅटफॉर्म’ बांधावा. त्यातून येवला स्थानकात मंजूर खत ‘रेक पॉइंट’ कार्यान्वित होऊन खताची रेक’ वाहतूक चालू करण्यास मदत होईल. तसेच सध्यस्थितीत येवल्याचे खताचे जे रेक’ आज मनमाड, नांदगाव येथे उतरतात, ते थेट येवल्यात उतरवले जातील. शिवाय येवला व नगरसूल स्थानकात देशातील भाविक शिर्डीकडे येत असतात. अशा पर्यटनातून व परिसरातून शेतमालाची वाहतूक मोठ्याप्रमाणात होते.

हेही वाचा:

The post येवला अन् नगरसूल स्थानकाचा रेल्वेच्या अमृत योजनेत समावेश करा : छगन भुजबळ  appeared first on पुढारी.

Exit mobile version