येवला तालुक्यात मृत्यूचे तांडव! नागरिकांचा हलगर्जीपणा उठतोय त्यांच्याच जीवावर

येवला (जि. नाशिक) : वेळेत उपचारासाठी नागरीकांचा हलगर्जीपणा आता त्यांच्याच जीवावर उठत असून, कोरोनाचा वाढलेला फैलाव अन्‌ काही अंशी आरोग्य यंत्रणेच्या त्रुटींमुळे रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. रुग्ण प्रचंड वाढल्याने येथील शासकीय व खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. ३० मार्चपासून तब्बल २४ जणांनी आपला जीव गमावला आहे. येथील मृत्यूंची संख्या ८७ वर पोचली आहे. 

रोजच सकाळी मृत्यूची बातमी येत असल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे. नागरिक त्रास जाणवू लागल्यावर पहिल्या टप्प्यात उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करत असून, तब्येत खालावल्यावर किंवा ऑक्सिजन कमी झाल्यावरच थेट हॉस्पिटल गाठत असल्याने रुग्ण गंभीर होण्याचे व दगावण्याचे प्रमाण जास्त असल्याचा दावा होत आहे. या हलगर्जीपणामुळे वयोवृद्धांसह बीपी व शुगरचा त्रास असलेल्यांचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बळी जात असल्याच्या घटना घडत आहेत. येथील आरोग्य विभागाने पहिल्या टप्प्यात चांगले काम केले होते. मात्र, आता काहीसा तणाव घेऊन काम होत असल्याचे दिसते. तालुका आरोग्य अधिकारी म्हणून हितेंद्र गायकवाड चांगले काम करत असताना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा अतिरिक्त कारभार काढून घेतल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

त्यातच शहरातील उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित करून येथे अपुरी कर्मचारी संख्या व डॉक्टरांची कमी असताना कोविड केअर सेंटर सुरू केले खरे परंतु, येथेच रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑक्सिजनची सुविधा असल्याने येथे मनमाड, लासलगाव, निफाड या भागातूनही अनेक पेशंट ठेवले जात आहेत. गंभीर बाब म्हणजे मागील दहा दिवसात २४ जणांनी जीव गमावला असल्याने भीती वाढली आहे. खासगी दवाखान्यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक उपचार घेत असून, तेथेही बेड शिल्लक नाही. अनेक जण तर होमक्वॉरंटाईन होऊन उपचार घेत आहेत. एकूणच परिस्थिती बिकट होत चालली असून, वाढत्या मृत्यूमुळे आजारी होणाऱ्यांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होऊ लागला असल्याची परिस्थिती आहे. याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

मृतांचा आकडा शंभरीकडे... 

इतर तालुक्यांचा विचार करता येथे कोरोना रुग्ण संख्येचा आकडा मर्यादित असल्याचे दिसते. आतापर्यंत २ हजार ३८४ रुग्ण आढळून आले असून, यातील १ हजार ९३७ जण बरे झालेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांच्यावर आहे. सध्या ३६० रुग्ण खासगी, सरकारी व घरगुती उपचार घेत आहेत. मृतांचा आकडा अचानक वाढून ८७ वर गेल्याने पूर्वी एक ते दीड टक्के असलेला मृत्यू दर तीन टक्क्यांवर पोहोचला असल्याने भीती व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात पाहिजे तितकी काळजी नागरिक घेत नसल्याने रुग्ण संख्या वाढत असून, हा चिंतेचा विषय बनला आहे. 

पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी... 

येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर कार्यान्वित केल्याने दररोजची इतर आजारांची तपासणी बंद करण्यात आल्याने सर्वसामान्यांची गैरसोय सुरू झाली आहे. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे कोविडच्या उपचारालाच मर्यादा पडत आहेत. शिवाय लसीकरणासाठी काही कर्मचारी अडकत आहेत. येथे नियमित रुग्ण व कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन तातडीने पुरेशा प्रमाणात आरोग्य कर्मचारी उपलब्ध करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.  

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ