येवलेकरांना पिवळे, गढूळ पाणीपुरवठा; अपक्ष नगरसेवकांची नगराध्यक्षांकडे तक्रार 

नाशिक/येवला : शहराला गेल्या काही दिवसांपासून गढूळ, पिवळसर दूषित पाणीपुरवठा होत असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी येथील नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्याकडे अपक्ष नगरसेवकांनी केली आहे. 
या समस्येकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक रूपेश लोणारी, अमजद शेख, नगरसेविका पद्माताई शिंदे यांनी नक्षराध्यक्ष क्षीरसागर भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचत निवेदन दिले. 

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छतेसंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहरात दूषित पाणीपुरवठा होत असून, असा पाणीपुरवठा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. पालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा गढूळ, गंजलेले व चिखलयुक्त पाणीही शहरवासीयांना येत आहे. तसेच अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रावर १५ अश्वशक्तीचा वीजपंप बदलून तेथे २५ अश्वशक्तीचे वीजपंप बसवावेत व शहराला दोन दिवसांत पाणीपुरवठा करावा. याशिवाय शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आलमचीही व्यवस्था करण्यात यावी आणि जलशुद्धीकरण केंद्राचे सुशोभीकरण करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

लोणारींचे सोशल पत्र व्हायरल! 

शहरातील अस्वच्छता व विविध मूलभूत समस्यांसंदर्भात शिवसेनेचे शहर संघटक राहुल लोणारी यांनी सोशल मीडियावर पालिकेला आवाहन करणारे पत्र व्हायरल केले असून, त्याची चांगलीच चर्चा होत आहे. या पत्रात लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना साष्टांग दंडवत घालून डासांचा शहरात प्रचंड सुळसुळाट वाढला असून, निवेदनाची वाट न पाहता नगर परिषदेने स्वतःहून लक्ष घातले पाहिजे याकरिता जनतेने लोकप्रतिनिधी व शासनाने अधिकारी नियुक्त केले असल्याचे स्मरण व्हावे. कोरोनाच्या संकटातून कुठेतरी शहर सावरत असताना डेंगी, मलेरियाचा धुमाकूळ येवल्यात वाढू नये याची जबाबदारी व खबरदारी नगर परिषदेने घेणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता