येवल्याच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! बहुगुणी काळ्या गव्हाचे पीक; कृषी विभागाकडून कौतुक 

नगरसूल (जि.नाशिक) : जसे पिकांचे वाण उपलब्ध होईल तसे येथील शेतकरीही नवनवीन प्रयोग करतात. जिल्ह्यात काळा गव्हाचे पीक घेण्याचा असाच आगळावेगळा प्रयोग अवर्षणप्रवण व दुष्काळी असलेल्या येवला तालुक्यात झाला. नगरसूल शिवारात प्रगतशील शेतकरी प्रशांत सानप यांनी शेतात काळ्या गव्हाचे पीक घेतले असून, कृषी अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे. 

प्रशांत सानप यांनी पिकविलेल्या गव्हाची उत्सुकता
आहारात जीवनसत्व व पोषण मूल्यांच्या अभावामुळे अनेक आजार जडतात. त्यामुळे मोहाली संशोधन संस्था नॅशनल ॲग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांनी सात वर्षांच्या संशोधनानंतर गव्हाचे पेटंट घेऊन इतर गव्हाच्या तुलनेत पौष्टिक घटक असलेला हा काळा गहू विकसित केला. कर्करोग, मधुमेह, लठ्ठपणा, तणाव थांबविण्यास या गव्हाची मदत होत असल्याचेही सांगितले जाते. गव्हामध्ये एंथिसायनिनचे प्रमाण ५ ते १५ टक्के आहे. काळ्या गव्हांमध्ये हेच प्रमाण ४० ते १४० टक्के प्रति मिलियम आढळते. गव्हामध्ये मॅग्नेशियम, आर्यन, झिंकचे प्रमाणही अधिक असल्याने याचा खाण्यासाठी अधिक वापर होऊ शकेल, असा विश्वास सानप यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

कृषी विभागाकडून कौतुक 
मूळात अवर्षणप्रवण असलेल्या या तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी नेहमीच नवनवीन प्रयोगाला साद घातली आहे. येथील बीएससी ॲग्री पदवीधर असलेले सानप शेतीत नेहमीच प्रयोग राबवतात. या वर्षी त्यांनी (एनबीएमजी) या गव्हाचे काळे वाण पिकविले आहे. साधारणतः अर्धा एकरात हे पीक त्यांनी घेतले असून, नुकतीच तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, शेतकरी डॉ. कैलास अभंग, अरुण सानप आदींनी या पिकाची पाहणी करून आढावा घेतला. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

काळ्या गव्हाची चव पहिल्यांदाच
त्यांच्या शेतातील या पिकाला प्रतिगव्हाला १५ ते १६ फुटवे असून, ओंबीमध्ये ४० ते ५० दाण्यांची संख्या आहे. सानप यांना आठ ते दहा क्विंटल गव्हाचे पीक निघण्याचा अंदाज आहे. गव्हाची चव पहिल्यांदाच तालुक्यातील शेतकरी घेऊ शकणार असून, हा प्रयोग यशस्वी झाल्याने इतर शेतकरीदेखील त्याचे अनुकरण करणार आहेत. 

 

स्वतः कृषिपदवीधर असल्याने अभ्यासातून या गव्हाची माहिती मिळाली. त्याचे बियाणे उपलब्ध करून मी गव्हाचे पीक घेतले आहे. शरीरासाठी अत्यावश्यक असलेले घटक या गव्हातून मिळणार असल्याने नक्कीच भविष्यात हा गहू अधिक प्रमाणात पिकविला जाईल व खाण्यात वापरला ही जाईल. 
- प्रशांत सानप, कृषी पदवीधर, येवला