येवल्यातील शेतकऱ्याने डाळिंब बागेवर फिरवला जेसीबी; अडीच एकरची बाग भुईसपाट

नाशिक : अंदरसूल (ता. येवला) आधी पाऊस अन् नंतर बाजारभाव खर्चसुद्धा भरुन निघत नसल्याने घेतला निर्णय. अन् काही तासांतच पीक केले जमीनदोस्त. अडीच एकर शेतपीक झाले नाहीसे.

अडीच एकर शेतात ८०० झाडांची लागवड

अंदरसूल येथील शेतकऱ्याने निराशेपोटी आपल्या उभ्या अडीच एकर डाळिंब बागेवर जेसीबी फिरवला. गजाजन जिवाजीराव देशमुख असे निराशेपोटी पाऊल उचलणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. पावसामुळे झालेले नुकसान व बाजारभावाअभावी केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी सहा वर्षांपूर्वी आपल्या अडीच एकर शेतात ८०० झाडांची लागवड करीत डाळिंब बाग उभी केली. पहिले तीन वर्षे डाळिंबाला चांगला भाव मिळाला. या तीन वर्षात ५० ते ६० रुपये किलो प्रमाणे पैसे त्यांच्या हाती पडले. नंतर मात्र त्यांना समाधानकारक दर मिळाला नाही. यंदा मात्र चालू वर्षी अतिवृष्टीसह तेल्याचा रोगाचा फटका या शेतकऱ्याला बसला आहे.

उत्पन्न मात्र अवघे ४० हजार

पावसामुळे जे हाती आलं होतं ते देखील गेलं. तेल्या रोगाचे डाग अधिक असल्याने बाजारभाव मिळाला नाही. काढणीस आलेल्या फळांची स्थानिक बाजारात कोपरगाव येथे केली. त्यास १० ते १२ रुपये प्रतिकिलो सरासरी दर मिळाला. या क्षेत्रात अवघे २०० क्रेट डाळिंब म्हणजे ४० क्विंटल माल निघाला. चालू वर्षी हंगामात दीड लाखांवर खर्च केला. मात्र, उत्पन्न अवघे ४० हजार मिळाल्याने खर्चाचा ताळमेळ बसला नाही. त्यात उत्पादन निम्म्यावर घटल्याने खर्चही वसूल झालेला नाही. परिणामी तीन वर्षांपासून सततच्या नुकसानीला कंटाळून देशमुख यांनी बागेवर जेसीबी फिरवला.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

अगोदरही निसर्ग चक्रीवादळामुळे पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक अडचणीत आली. त्यातच आता डाळिंब बागेत खर्च करून काही हाती येत नसल्याने कठोर अंतकरणाने बाग तोडण्याचा निर्णय घेतला. - गजानन देशमुख, शेतकरी

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल