येवल्यात कांद्याचे भाव गडगडले! तीनच दिवसांत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमागे ५० हजारांचा भुर्दंड 

येवला (जि.नाशिक) : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ अन्‌ गुरुवारी २५०१... तीनच दिवसांत लाल कांद्याच्या दरात इतकी तफावत झाल्याने शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. गुरुवारी (ता.२५) भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमागे ५० हजारांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. 

बुधवारी (ता.२४) लाल कांदा बाजारभावात सोमवारच्या तुलनेत मोठी घसरण झाली होती. मात्र, आज (ता. २५) देखील लाल कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडले. गुरुवारी येवल्यात लाल कांद्यास सरासरी २ हजार रुपये बाजारभाव मिळाला. सोमवारी चार हजारांचा टप्पा ओलांडल्याने शेतकरी सुखावले होते. मात्र, अचानक भाव गडगडू लागल्याने अजूनच मन:स्ताप होत आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा 

बुधवारी लाल कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण होताना गुरुवारच्या कांदा लिलावात काय चित्र समोर येते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात लाल कांद्यास प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते ४ हजार २३० (सरासरी ३६००) तर बुधवारी किमान १ हजार ते कमाल ३४८१ (सरासरी ३ हजार) रुपये बाजारभाव मिळाला होता. गुरुवारी मात्र हे बाजारभाव अगदी मोठ्या प्रमाणात खाली आले. येथे गुरुवारी ५० ट्रॅक्टर आणि ६०० रिक्षा पिकअपमधून सुमारे साडेसहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याठिकाणी लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल २५०१ (सरासरी २ हजार) रुपये असा बाजारभाव मिळाला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी लाल कांदा किमान बाजारभाव प्रतिक्विंटल २०० रुपयांनी, कमाल बाजारभाव ९८०, तर सरासरी बाजारभाव १ हजार रुपयांनी खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

 शेतकऱ्यांना ५० हजारांचा भुर्दंड

या शेतकऱ्यांनी सोमवारी ट्रॅक्टरभर (सुमारे ३० क्विटल) कांद्याचे एक लाख २५ हजार रुपये घरी नेले. तेथे आज शेतकऱ्यांना कोसळलेल्या बाजारभावामुळे सुमारे ५० हजाराचा भुर्दंड सहन करावा लागला असून, ७५ हजारांवरच समाधान मानावे लागले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा चेहरा आज पडलेला होता. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!