येवल्यात कोरोना बाधितांची शंभरी पार; प्रशासनासह नागरिकांचे वाढले टेन्शन 

येवला (जि. नाशिक) : येथे रोजच कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, हा आकडा शंभरी पार गेला आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचे टेन्शनही वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील नगरपालिकेनेही शहरासाठी नियमावली जाहीर केली असून, नागरिकांनी या निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी केले आहे. 

येथे मंगळवारी (ता. ९) तब्बल १५ जण एकाच वेळी पॉझिटिव्ह निघाले असून, ही संख्या ९३ वर पोहोचली होती. तर, बुधवारी (ता.१०) नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता हा आकडा शंभरी ओलांडून गेल्याने चिंतेत अधिकच भर पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेने ही नागरिकांसाठी निर्बंध लागू केले आहेत.

असे असतील निर्बंध

शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सातपर्यंत चालू राहतील तर प्रत्येक शनिवार व रविवारी सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. याशिवाय दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजारही पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. लग्न व इतर समारंभ १५ मार्चपूर्वी नियोजित असल्यास संबंधित संस्थांच्या परवानगीने उरकावे, त्यासाठी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेसच परवानगी मिळणार आहे. १५ तारखेनंतर लॉन्स, मंगल कार्यालय व अन्य ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी असल्याचे आदेशात म्हटले आहे. याशिवाय खाद्यगृह, परमीटरूम सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीत ५० टक्के क्षमतेने व चालविता येईल. तर रात्री दहापर्यंत होम डिलिव्हरीसाठी परवानगी मिळाली आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

जिम, व्यायामशाळा सरावासाठी सुरू असतील. मात्र, येथे स्पर्धा घेता येणार नाही. याशिवाय सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, यात्रा यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळांना देखील सकाळी सात ते संध्याकाळी सातचा नियम पाच व्यक्तींसाठी लागू केला असून, शनिवार व रविवारी स्थळे बंद राहतील. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून, एका आड एक याप्रमाणे बाजारात विक्रेते बसतील. याशिवाय मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि त्याचा वापर करणे या अटी नागरिकांसाठी अनिवार्य आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या पत्रकाद्वारे मुख्याधिकारी नांदुरकर यांनी दिला आहे.  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO