येवल्यात खासगी रुग्णालयांकडून बाधितांच्या आकडेवारीची लपवाछपवी; अधिकाऱ्यांकडून सक्त ताकीद

येवला (जि.नाशिक) : येथे चार ते पाच खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मात्र, बाधितांची आकडेवारी प्रशासनाला मिळत नसल्याने गुरुवारी (ता.८) येथील अधिकाऱ्यांनी या रुग्णालयांना भेटी देत आकडेवारी कळविण्याच्या सूचना केल्या. तसेच, कोविड व नॉन कोविडचे रुग्ण वेगळेवेगळे ठेवण्याची सक्त ताकीद दिली. 

कोविड व नॉन कोविडचे रुग्ण वेगळेवेगळे ठेवण्याची ताकीद
शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात राहावी व कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावे, यासाठी तहसीलदार प्रमोद हिले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकाडे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कुप्पस्वामी यांच्या पथकाने कोरोनावर उपचार करणाऱ्या शहरातील खासगी रुग्णालयांची पाहणी करत काही ठिकाणी झाडाझडती घेतली. येथे डॉ. काकड, डॉ. शहा, डॉ. गायकवाड, डॉ. सोनवणे या हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार केले जात आहेत. यामुळे नागरिकांची सोय झाली असून, नाशिकला जाण्याचा त्रास कमी झाला आहे. शिवाय होम आयसोलेशनमध्येही उपचार घेणे शक्य होत असल्याने साहजिकच आरोग्य यंत्रणेवरचा ताणही कमी झाला असल्याने नागरिकही या उपचाराचे स्वागत करत आहेत. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

येवल्यात अधिकाऱ्यांकडून सक्त ताकीद, माहिती कळवण्याच्या सूचना 
मात्र, काही हॉस्पिटल नियम पाळत नसल्याच्या तक्रारी होत असल्याने अधिकाऱ्‍यांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन सूचना केल्या. मोहिमेची सुरवात विंचूर रस्त्यावरील शहा हॉस्पिटलपासून झाली. त्यानंतर पथकाने आपला मोर्चा गायकवाड हॉस्पिटलकडे वळवला. या दोन्ही रुग्णालयांत रुग्णांना मिळणाऱ्या उपचार व्यवस्थेची व स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. यानंतर पथकाने श्री साईसिद्धी हॉस्पिटलला भेट देऊन खासगी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, उपचार, रुग्णालयाची स्वच्छता याबाबत आढावा घेतला. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

खासगी रुग्णालयानी कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांच्याबद्दलची माहिती रोज आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे. जी रुग्णालये ही माहिती देणार नाही, अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. शरद कातकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, येवला