येवल्यात पोलिस ठाण्याला भंगार बाजाराचे स्वरूप! आवारात कोट्यवधींची वाहने धूळखात 

येवला (जि. नाशिक) : चोरीच्या सापडलेल्या, बेवारस आठळलेल्या, अपघातातील जप्त शेकडो मोटरसायकलींसह अन्य वाहनांनी येवला शहर व तालुका पोलिस ठाण्याचे आवार फुल झाले आहे. गाड्यांची संख्या शेकडो असल्याने आवाराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलिस वारंवार मालकांना ओळख पटवून गाड्या घेऊन जाण्याचे आवाहन करत असले तरी वर्षानुवर्ष गाड्या पडून असून, त्यांची संख्या वाढतच चालली आहे. 

नाशिक-औरंगाबाद व नगर-धुळे हे महामार्ग शहरातून जात असल्याने अपघातांचे प्रमाण जास्तच आहे. शिवाय मालेगाव, श्रीरामपूर ही शहरे जवळ असल्याने येथे मोटरसायकली चोरांची प्रमाण सर्वाधिक असल्याचे आकडेवारी सांगते. यातील अनेक चोरी गेलेल्या गाड्या पोलिसांनी शोधूनही काढल्या, पण त्यांना मूळ मालकच न सापडल्याने अशा शेकडो गाड्या पडून आहेत. 
अपघात झालेली, बेवारस, चोरट्यांकडून हस्तगत केलेली तसेच विविध गुन्ह्यातर्गत जप्त केलेली कोट्यवधींची वाहने आवारात उभी असून यातील अनेक वाहनांना अक्षरशः गंज चढलेला आहे. यात दुचाकींची संख्या मोठी आहे. बहुतांश वाहनांचे सुटे भागही दिसेनासे झाले आहेत. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

दोन्हीही पोलिस ठाण्यांच्या आवारात मिळून पाचशेच्या आसपास दुचाकी व इतर गाड्या आहेत. यासंदर्भात पोलिसांनी सोशल मीडियासह संकेतस्थळावरही वारंवार आवाहन केले. परंतु मूळ मालकांनी गाड्या का नेल्या नाही हा संशोधनाचा भाग आहे. त्यातही पोलिसांकडून गाड्या घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागत असल्याने अपघातातील अनेक गाड्यांचा नादच मालकांनी सोडून दिल्याचे सांगितले जाते. या सर्व प्रक्रियेत मात्र पोलिस ठाण्याच्या आवार माणसांऐवजी वाहनांच्या गर्दीने फुल होत आहे. तालुका पोलिस ठाणे भव्यदिव्य नव्या इमारतीत सुरू झाले असले तरी या इमारतीलादेखील जुन्या वाहनांनी वेढा घातल्याचे चित्र दिसते. पोलिस मात्र वारंवार या वाहनांच्या मालकांचा शोध घेताना दिसत आहे. 
मोठ्या प्रमाणावर दुचाकींची संख्या असल्याने या गाड्यांच्या मालकांच्या शोधासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

आम्ही अनेकदा पोलिस ठाण्याच्या आवारात चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेली वाहने मूळ मालकांनी घेऊन जावी, असे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरही गाड्याचे क्रमांक प्रसिद्ध केले. पण अनेकजण दुर्लक्ष करतात. त्यामुळे संख्या वाढत आहे. वाहन मालकांनी अजूनही ओळख पटवून आपली वाहने घेऊन जावीत. 
- अनिल भवारी, पोलिस निरीक्षक, तालुका ठाणे