येवल्यात लाल कांदा आवकेत वाढ! बाजारभावात घसरण, हरभरा-सोयाबीनच्या दरात वाढ  

येवला (जि.नाशिक) : सप्ताहात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल आवारात लाल कांदा आवकेत वाढ झाली, तर देशावर मागणी कमी झाल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले. 

लाल कांदा आवकेत वाढ, बाजारभावात घसरण 
कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांत व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात कांदा आवक ८२ हजार २३६ क्विंटल झाली. बाजारभाव ३०० ते कमाल एक हजार ४४१ क्विंटल, तर सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची आवक ३८ हजार ४६० क्विंटल झाली. लाल कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल एक हजार ४७६, तर सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. गव्हाची आवक टिकून होती, तर गव्हास स्थानिक व्यापारीवर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. आवक एक हजार २८२ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान एक हजार ५५० ते कमाल एक हजार ८८१, तर सरासरी एक हजार ७१५ रुपयांपर्यंत होते. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

आवकेत व बाजारभावात वाढ
बाजरीची आवक टिकून होती, तर मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. आवक ३५४ क्विंटल झाली असून, बाजारभाव एक हजार २२५ ते एक हजार ७००, तर सरासरी एक हजार २७० रुपयांपर्यंत होते. 
सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाली. हरभऱ्याची आवक २११ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान तीन हजार ६५० ते पाच हजार ३०, तर सरासरी चार हजार ८५० पर्यंत होते. तुरीच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात तुरीची आवक ६० क्विंटल झाली असून, बाजारभाव पाच हजार ते सहा हजार ५००, तर सरासरी सहा हजार २०० रुपयांपर्यंत होते. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी
सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. सोयाबीनला स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. बाजारभाव चार हजार २०० ते पाच हजार ८००, तर सरासरी पाच हजार ३०० रुपयापर्यंत होते. मक्याच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मक्याची आवक दहा हजार २३७ क्विंटल झाली. बाजारभाव एक हजार ३२५ ते एक हजार ५१७, तर सरासरी एक हजार ४६५ प्रतिक्विंटलपर्यंत होते. उपबाजार अंदरसूल येथे मक्याची आवक २३१ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान एक हजार २०० ते एक हजार ४५५, तर सरासरी एक हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.