येवल्यात लाल कांद्याची घसरण; हंगामातील नीचांकी दर मिळाल्याने शेतकरी हतबल

येवला (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१०) हंगामातील नीचांकी दर मिळाला. लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजाराच्या खाली आले. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

गेल्या सप्ताहापासून कांदा बाजारभावाचा आलेख खाली येताना बुधवारीही लाल कांद्याचे बाजारभाव खाली आल्याचे दिसून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी १८ हजार क्विंटल इतकी लाल कांद्याची विक्रमी आवक होताना कांदा बाजारभाव गडगडले.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात बुधवारी ७०० ट्रॅक्टरमधून सुमारे १८ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. येथे लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल एक हजार ३२७ (सरासरी ९००) रुपये बाजारभाव मिळाला. अंदरसूल उपबाजार आवारात ३५५ ट्रॅक्टरमधून सुमारे सात हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. येथे लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल एक हजार ३४० (सरासरी एक हजार) रुपये असा बाजारभाव मिळाला. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कांद्याच्या किमान दरात २०० रुपयांनी, कमाल दरात ११६ रुपयांनी, तर सरासरी दरात २०० रुपयांनी घसरण झाली. कांदा दरात दिवसागणिक घसरण होत चालल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. त्यातच भावात घसरण होत असल्याने शेतकरी कांदा विक्रीला आणत असून, याचाही परिणाम दरावर होत आहे.  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO