येसगावच्या ॲपल बोरांचा बाजारात गोडवा; शेतकऱ्यांची बोर लागवडीतून लाखोंची कमाई

नाशिक/येसगाव : थंडीची चाहूल लागताच बाजारात वेगवेगळ्या प्रकारची गावठी, उमरान (सामबोरे), मेहरून, तसेच ॲपल बोर सर्वत्र दिसत आहेत. सध्या नवीन जातीच्या ॲपल बोरालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून गाव परिसरात ॲपल बोरचे क्षेत्र वाढले आहे. त्यातूनच येसगावच्या ॲपल बोरांचा बाजारात सर्वत्र गोडवा दिसत आहे. 

बोरीची झाडांवर वातावरणाचा कमी परिणाम

सध्या निसर्ग बदलत चालला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तयार पीक व फळबागांना फटका बसतो. परंतु वातावरणाशी दोन हात करून बोरीची झाडे तग धरून राहतात. या हेतूने बोरांकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. बोरलागवडीतून शेतकऱ्यांचा लाखोंचा लाभ होत आहे. यंदा द्राक्ष, डाळिंब, कांदा व इतर पिकांचे बेमोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र बोरांच्या झाडांना त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. तशा परिस्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी बोरांपासून चांगला लाभ मिळविला.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बाजारात चांगला भाव

बोर उत्पादकांनी या वर्षीही वातावरणाचा अंदाज बांधून वेळेवर छाटणी, खते, फवारणी करण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबून बोरांच्या बागा फुलविल्या आहेत. फांद्या फळांनी लगडलेल्या आहेत. कलमाची बोर लावायची म्हणजे सुरवातीला गावठी बोरीच्या बिया शेतात योग्य अंतरावर उगवून फांदी कलमाला योग्य झाल्यावर त्यावर कलम केली जात होती. मात्र आता नर्सरीतच कलमाची तयार रोपे मिळू लागली आहेत. त्यामुळे उत्पादन लवकर घेता येते. वेळही वाया जात नाही. सध्या ॲपल बोराला बाजारात चांगला भाव मिळत आहे. बोरांची छाटणी बुडापासून दर वर्षी करावी लागते. त्यामुळे लाकडाचा सरपण म्हणूनही उपयोग होतो. तसेच काटेरी बारीक फांद्यांचा उपयोग शेताला कूपंणासाठी होतो. वाळलेल्या पानांचा शेतातच खतासाठी उपयोग होतो. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

कोकोनट जातीचे ॲपल बोर लावले आहे. बोरांचा चांगला हंगाम येण्यास सुरवात झाली आहे. कठीण वातावरणातही बोरांपासून चांगला लाभ मिळाला होता. आधुनिक पद्धतीने बोरांचे उत्पादन घेत असल्यामुळे एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्चातून अडीच ते तीन लाखांपर्यंत उत्पादन येण्याची शक्यता असते. 
-सुनील शेलार, बोर उत्पादक, येसगाव बुद्रुक