रंगप्रेमींचा यंदाही बेरंग! रंगपंचमीला रहाडींच्या परिसरात संचारबंदीचे आदेश

पंचवटी (नाशिक) : होळीनंतर पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीला गंगाघाटासह शनीचौकातील प्राचीन रहाडीत धप्पे मारत रंगात रंगण्याची परंपरा यंदा कोरोना संसर्गामुळे पुन्हा खंडित होणार आहे. या दिवशी सार्वजनिक ठिकाणी व रहाडींमध्ये रंग खेळण्यास पोलिस प्रशासनाने मनाई केली आहे. एवढेच नव्हे, तर परिसरात संचारबंदीही लागू केली आहे. त्यामुळे रंगप्रेमींचा यंदाही बेरंग होणार आहे. 

उत्तरेकडे धूलिवंदनाच्या दिवशी रंगोत्सव रंगतो. परंतु, नाशिकमधील रहाडींची प्राचीन परंपरा व त्यानिमित्ताने उडणारी धूम रंगपंचमीलाच पाहावायास मिळते. परंतु, वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे पोलिस प्रशाससाने शहरातील रहाडी असलेल्या परिसरात याकाळात संचारबंदी लागू केल्याने यंदा घराच्या आवारात रंगोत्सव रंगण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

नाशिक शहर व रहाडी यांची प्राचीन परंपरा आहे. पेशवेकाळात व त्यापूर्वी शहराच्या काही भागांत रहाडी खोदण्यात आल्या. कालौघात त्यातील काही नष्ट झाल्या, तरीही त्यातील चार ते पाच रहाडी अद्यापही सुस्थितीत असल्याने याठिकाणी रंगपंचमीला रंगप्रेमींची तुफानी धूम पाहावयास मिळते. परंतु वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे धास्तावलेल्या पोलिस प्रशासनाने रंगोत्सवावर फुली मारल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. रहाड खोदणे सोडाच, याठिकाणी फिरण्यासाठी प्रशासन परवानगी देणार नाही, असे चित्र आहे. त्यामुळे अनेक रंगप्रेमींना केवळ टिळ्यावरच समाधान मानावे लागणार आहे. 
पंचवटी पोलिसांनी रहाडींच्या परिसरात बंदोबस्त लावला असून, काही ठिकाणी बॅरिकेडींगही केले आहे. याशिवाय काही ठिकाणी पुन्हा लोखंडी बॅरिकेडस करण्यात येणार असल्याचे पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले. रहाडी बंद राहणार असल्याने रंगप्रेमींचा मात्र चांगलाच बेरंग झाला आहे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड