रंगीत द्राक्षं खाताएत भाव! अस्मानी संकटाचा सामना करीत निर्यातीसाठी शेतकरी सज्ज 

कसबे सुकेणे (जि.नाशिक) : मौजे सुकेणे, कसबे सुकेणे व परिसरात निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन झाले आहे. यंदा निर्यातक्षम द्राक्षांना युरोपीयन देशांमध्ये मोठी मागणी असल्याने निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे. 
सुकेणे परिसरात १५ दिवसांपासून निर्यातक्षम द्राक्षांना मोठी मागणी असल्याने द्राक्ष बागायतदारांना द्राक्षाचा योग्य मोबदला मिळत आहे.

रंगीत द्राक्ष खाताय भाव 

सध्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो सरासरी ७० ते १०० रुपये भाव मिळत असून, उरलेल्या स्थानिक बाजारपेठेतील द्राक्षांना ३० ते ६० रुपये दर मिळत आहे. सध्या परिसरात मामा जम्बो, शरद सीडलेस, फ्लेम, नाना पर्पल, काळी सोनाका या रंगीत द्राक्षांना मोठी मागणी असून, सुकेणे परिसरात मोठ्या प्रमाणात काळ्या जातीची द्राक्ष निर्यातीसाठी सज्ज झाली आहेत. अनेक निर्यातदार कंपन्या परिसरात द्राक्षाची पाहणी करत असून, द्राक्षाच्या आकार व दर्जानुसार योग्य तो भाव दिला जात आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

अस्मानी संकटाचा सामना करीत निर्यातीसाठी शेतकरी सज्ज 
चालू वर्षी द्राक्षाची परिस्थिती चांगली असली तरी निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांनी अनेक मोठ्या संकटांचा सामना करून बागा वाचविल्या आहेत. नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंतच्या पावसाने द्राक्षाचे उत्पादन काही प्रमाणात घटले आहे. मात्र, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन तयार करण्यात द्राक्ष बागायतदारांना मोठी मेहनत घ्यावी लागली. ज्या द्राक्ष बागायतदारांनी मेहनत घेऊन आपली निर्यातक्षम द्राक्ष तयार केली त्यांना सध्या चांगले दिवस आले आहेत. मात्र, ज्या द्राक्ष बागायतदारांना बेमोसमी पावसापासून आपल्या द्राक्षबागांचे संरक्षण करता आले नाही त्या सर्व द्राक्षबागा आज फेलच्या स्थितीत असून, काही द्राक्षबागांना तडे गेल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

अनेक संकटांचा सामना करीत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे. अशा द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला माल निर्यातक्षम कंपन्यांना द्यावा. -वासुदेव काठे, समन्वयक, द्राक्ष प्रयोग परिवार, कसबे सुकेणे