रक्ताच्या थारोळ्यात पत्नी; पती फरार, सुखी संसार उध्वस्त!

सटाणा (जि.नाशिक) :  पती -पत्नी गेल्या काही महिन्यांपासून शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. दोघा पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून खटके देखील उडत होते. आणि अशातच त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. काय घडले नेमके? 

गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये खटके

हिरामण काळू वाघ (३६), संगीता हिरामण वाघ (३०) दोघे राहणार लोहणेर ता. देवळा हे पती -पत्नी गेल्या काही महिन्यांपासून दसाणे येथे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. दोघा पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून खटके उडत होते. मंगळवारी सायंकाळी संगीता आपल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने तत्काळ पोलिसांना खबर देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी; संगीताचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन संगीताला उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा उपचारपूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी कुऱ्हाड जप्त केली असून कुऱ्हाडीने खून करून फरार झालेल्या हिरामणला पोलिसांनी रात्री उशिरा जामोटी येथून शिताफीने अटक केली आहे.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

पतीवर खुनाचा गुन्हा; खून करण्यामागचे कारण अस्पष्ट

तीस वर्षीय पत्नीचा डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून पतीने खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२) सायंकाळी बागलाण तालुक्यातील दसाणे येथे उघडकीस आली. खून करून फरार झालेल्या पतीस पोलिसांनी रात्री उशिरा अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हिरामणने कुऱ्हाडीने संगीताची हत्या केल्याची कबुली दिली असली तरी खून करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा