रक्षा करणाऱ्या सीटबेल्टनेच केला घात! वाहनचालक १०० टक्के भाजला; ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती?

सातपूर (नाशिक) : वाहनचालकाने गाडीतून सुटका करण्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु सीटबेल्टमुळे सुटका होत नव्हती. अंगावर काटा आणणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. याच रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला आहे. आता पुन्हा अशीच घटना समोर आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. काय घडले नेमके?

आता पुन्हा अशीच घटना समोर

कैलास निवृत्ती शिंदे (वय ३९, रा. वरचे चुंचाळे, पाणीच्या टाकीजवळ, नाशिक) हे मुंबईवरून मालवाहतूक चारचाकी महिंद्र बोलेरो गाडीतून (एमएच १५, एफव्ही ७९३५) गंगापूर-महिरावणी रस्त्यावरून शिवाजीनगर येथे राहणाऱ्या मावसभावाला भेटायला जात होते. वासळी व पिंपळगाव शिवेजवळ गाडीला भीषण आग लागली. यामध्ये शिंदे १०० टक्के भाजले. त्यांचे वाहनदेखील जळून खाक झाले. या घटनेची माहिती सर्वांत प्रथम वासळीतील शिवसेनेचे पदाधिकारी शांताराम चव्हाण यांना समजली. चव्हाण यांनी सातपूर पोलिस ठाणे व अग्निशमन दलास माहिती कळविली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोचून आग विझविली.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

गाडीतून सुटका करण्यासाठी खूप प्रयत्न केले...

शिंदे यांनी आग लागलेल्या गाडीतून सुटका करण्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु सीटबेल्टमुळे सुटका होत नव्हती. यामध्ये ते १०० टक्के भाजले गेले. तरीदेखील आगीमध्ये सीटबेल्ट तुटल्यानंतर त्यांनी सुटका करून घेतली. रस्त्यावर लोळून त्यांनी अंगाची आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांना रात्री नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे. गाडीला लागलेल्या आगीची झळ दुसऱ्या वाहनांना लागू नये म्हणून त्यांनी आपली गाडी आतमधील रस्त्यावर उभी केली असल्याचे दिसून आले. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

घटनेची पुनरावृत्ती 
याच रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी डिसूझा नावाच्या उद्योगपतीला गाडीतच जाळून मारण्याचा प्रकार घडला आहे. आता पुन्हा अशीच घटना समोर आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. गंगापूर-महिरावणी रस्त्यावर धावत्या चारचाकी वाहनाने मंगळवारी (ता. १६) रात्री नऊच्या सुमारास अचानक पेट घेतला. यात वाहनचालक १०० टक्के भाजून गंभीर झाला. घटनेबद्दल नातेवाईक घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत.