रतन इंडियाचा वीज प्रकल्प सुरू करा; आमदार कोकाटेंची ऊर्जा सचिवांकडे मागणी 

सिन्नर (नाशिक) : गुळवंच (ता. सिन्नर) येथील सेझमध्ये उभारण्यात आलेल्या रतन इंडियाच्या औष्णिक वीज प्रकल्पास गती द्यावी तसेच शक्य असल्यास महानिर्मिती कंपनीने म्हणजेच सरकारने तो चालवण्यास घ्यावा, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राज्याचे ऊर्जासचिव असीम गुप्ता यांच्याकडे केली. 

पुढील महिन्यात प्रत्यक्ष पाहणी

आमदार कोकाटे यांच्या पुढाकाराने दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे मंत्रालयात ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांसोबत बैठक झाली. जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, रतन इंडियाचे अभिमन्यूसिंग राठोड उपस्थित होते. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार कोकाटे यांनी बंद पडलेला सेझ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन जनतेला दिले होते. त्या अनुषंगाने दोन आठवड्यांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची त्यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली होती. मंत्री राऊत यांनी गुप्ता यांच्यासोबत बैठक घेऊन तांत्रिक मुद्द्यांची सविस्तर माहिती द्यावी, असे सूचित केले होते. त्यानुसार झालेल्या बैठकीत गुप्ता यांनी एकलहरे ते गुळवंचदरम्यान रेल्वेमार्गाची उभारणी करण्याचे काम किती दिवसांत पूर्ण होऊ शकेल? प्रकल्प सुरू झाल्यास किती क्षमतेने वीज उत्पादन होईल यांसह तांत्रिक मुद्द्यावर राठोड यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शासन स्तरावर प्रकल्प सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाणार असून, पुढील महिन्यात महानिर्मितीचे उच्चस्तरीय तांत्रिक पथक प्रत्यक्ष पाहणी करून शासनास अहवाल सादर करील, असे श्री. गुप्ता यांनी या वेळी स्पष्ट केले. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

 
प्रकल्प सुरू करणे हा अवघड प्रश्‍न आहे. एका झटक्यात तो सुटणार नाही. ऊर्जामंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा टप्प्याटप्प्याने बैठका घ्याव्या लागतील. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल. ही प्रारंभिक चर्चा आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार. 
- आमदार माणिकराव कोकाटे 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता