रब्बीच्या पिकांसाठी गुलाबी थंडीची भासतेय उणीव; जिल्ह्यात ५८ टक्के क्षेत्रांवर पेरणी

येवला (नाशिक) : खरिपात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी अनुकूल वातावरण असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ५८ टक्के क्षेत्रांवर रब्बीची पेरणी झाली आहे. मात्र, बागायतदारांच्या जिल्ह्यात रब्बीच्या पिकांसाठी मात्र थंडीची उणीव भासत असून, ढगाळ हवामानाचा फटकाही जमिनीच्या वर येऊ लागलेल्या पिकांना बसत असल्याने शेतकरी आताच हवालदिल झाल्याचे दिसत आहे. 

शेतकरी थंडीच्या प्रतीक्षेत

परिस्थितीनुसार जिल्ह्यात रब्बीचा पीकपॅटर्न बदलत असून, रब्बी मका, हरभरा व कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. या वर्षी दुष्काळी तालुकेही रब्बी पिके पिकवणार असून, हीच लगबग सुरू आहे. तर बागायतदारांच्या तालुक्यात पुरेसे पाणी असल्याने या पट्ट्यात पेरणीची तयारी सुरू आहे. अवर्षणप्रवण असलेल्या मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर भागांत रब्बीच्या पिकांची पेरणी सुरू झाली असून, बहुतांशी क्षेत्रांवर पेरणी उरकत आली आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर अद्यापही अपेक्षित थंडी पडलेली नाही. त्याचा फटका रब्बीच्या पिकांच्या वाढीवर होत आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा व कांदे पिकांसाठी थंडी लाभदायी असते. पिकांच्या वाढीसह रोगांचा प्रादुर्भाव यामुळे कमी होतो; परंतु हीच थंडी अजूनही बेपत्ता असल्याने शेतकरी थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय अधूनमधून येणाऱ्या ढगाळ हवामानामुळेही शेतकरी चिंतातूर झाले आहेत. 

सध्या बागलाण, नाशिक, चांदवड, येवला, सिन्नर, मालेगाव या तालुक्यांमध्ये रब्बीची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. याउलट पुरेसे पाणी असलेल्या निफाड, दिंडोरीत आता पेरणीला सुरवात झालेली आहे. आतापर्यंत गव्हाची २८ हजार ६६२ (४६ टक्के), मक्याची तीन हजार ४२२ (८४ टक्के), हरभऱ्याची १९ हजार ६८९ (५२ टक्के), तर ज्वारीची दोन हजार १७५ (३४ टक्के) हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, पुढील दोन आठवड्यांत रब्बीची पेरणी पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

जिल्ह्यात आजपर्यंतची पेरणी (हेक्टरमध्ये) 

तालुका सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्के 
मालेगाव ८,०७० ७,२१३ ८९ 
बागलाण ११,७२५ १०,२८५ ८७ 
कळवण ७,९९३ २,८२८ ३५ 
देवळा २,४१३ ७४१ ३० 
नांदगाव ५,१४३ ५,२२६ १०१ 
सुरगाणा २,८०३ १,२०८ ४३ 
नाशिक ३,६८० ३,०९५ ८४ 
त्र्यंबकेश्वर २,०९७ ५०८ २४.२३ 
दिंडोरी १०,८८६ ६,३२४ ५८ 
इगतपुरी ३,१६९ ७८४ २५ 
पेठ १,७०५ ९८१ ५७ 
निफाड १७,८९१ ६,९११ ३९ 
सिन्नर १७,१०९ १०,५४१ ६२ 
येवला १०,९६८ ६,३४७ ५८ 
चांदवड ७,१२० २,९५३ ४१ 
जिल्हा १,१२,७७९ ६५,९४९ ५८.४८   

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच